माणगाव नगरपंचायतीच्या विशेष सभेत प्रस्ताव एकमताने फेटाळला; सत्ताधारी नेतृत्वाच्या भूमिकेलाही धक्का
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव नगरपंचायतीच्या विशेष सभेत प्रस्तावित भुयारी गटार योजना (एसटीपी) नगरसेवकांनी एकमताने धुडकावून लावली. विशेष म्हणजे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाच्या भूमिकेला छेद देत नगरसेवकांनी हा निर्णय घेतल्याने माणगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या बैठकीला नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, उपनगराध्यक्ष रिया उभारे, पाणीपुरवठा सभापती अजित तारलेकर, स्वच्छता सभापती आनंद यादव, माहिला व बालकल्याण समिती सभापती नंदिनी बामगुडे, उपसभापती रश्मी मुंढे, नगरसेविका लक्ष्मी जाधव, नगरसेविका ममता थोरे, नगरसेवक राजेश मेहता, नगरसेविका हर्षदा सोंडकर, नगरसेविका सुशीला वाढवळ, नगरसेवक कपिल गायकवाड, नगरसेवक ज्ञानदेव पवार, नगरसेवक दिनेश रातवडकर, स्वीकृत नगरसेवक विश्वजित जाधव, स्वीकृत नगरसेवक विठोबा पालकर आदी नगरसेवक उपस्थित होते.
जागतिक बँक सहाय्यित अंतर्गत माणगाव नगरपंचायतीसाठी भुयारी गटार योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता मिळविण्याच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. 27) नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. मात्र, चर्चेनंतर नगरसेवकांनी योजनेला विरोध दर्शवत प्रस्ताव फेटाळला. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ज्ञानदेव पवार यांनी सर्व्हे क्रमांक 258 हा खांदाड येथील शेतकऱ्यांच्या मालकीचा असल्याने त्या ठिकाणी योजना राबवू नये, अशी भूमिका मांडली. त्यानंतर इतर नगरसेवकांनीही चर्चा करून योजनेला विरोध केला. भुयारी गटार झाले म्हणजे माणगावचा विकास झाला असे नाही, अशी भूमिका नगरसेवकांनी मांडली. गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेले नाट्यगृह, नाना-नानी पार्कचा अभाव, तरुणांसाठी क्रीडांगणाची गरज आणि शहरातील खड्डेमय अंतर्गत रस्ते यांसारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
माणगावचा विकास रोह्याच्या धर्तीवर व्हावा आणि चांगल्या विकासकामांना आपला पाठिंबा राहील, असे ज्ञानदेव पवार यांनी सांगितले. या निर्णयामुळे सत्ताधारी गटातील अंतर्गत मतभेदांची चर्चा रंगली असून, एकमताने प्रस्ताव फेटाळण्याची घटना माणगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. नगरसेवक प्रशांत साबळे यांनीही दूरध्वनीवरून या निर्णयाला पाठिंबा दिला. याबाबत माणगाव नगरीच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच नगरपंचायत मुख्याधिकारी संतोष माळी यांनी प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ मागितला.







