मासेमारी हंगामापूर्वी गाळ काढण्याची मागणी
मच्छिमारांचे तहसीलदारांना निवेदन
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड-एकदरा खाडीतील वाढत्या गाळामुळे मच्छिमारांच्या बोटींच्या ये-जा करण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्ट रोजी संपणार असून, त्यानंतर मासेमारीचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वी खाडीतील गाळ तातडीने काढून खाडीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी मुरूड सागरकन्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या वतीने मुरूड तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुरूड-एकदरा परिसरातील कोळी बांधव आपल्या मासेमारीच्या बोटी खाडीजवळ समुद्रात नांगर टाकून उभ्या करतात. मात्र, दिवसेंदिवस खाडीमध्ये गाळ साचत असल्याने बोटी काढताना अडचणी निर्माण होत आहेत. खाडीच्या मुख्य मार्गात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने मासेमारी बोटींचे अपघात होण्याची शक्यता वाढली असून, भविष्यात नौकांची ये-जा पूर्णपणे बंद होण्याची भीती मच्छिमारांनी व्यक्त केली आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून एकदरा-मुरूड खाडी परिसरात ग्रोयन्स बंधारा तसेच खाडीतील गाळ काढण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. ग्रोयन्स बंधाऱ्याचे काम सुरू करण्यात आले होते; मात्र हे काम अपूर्ण राहिल्याने पावसाळ्यातील पाण्याच्या प्रवाहामुळे खाडीच्या मार्गात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
चार मच्छिमार संस्थांमधील बांधवांकडून खाडीतील गाळामुळे निर्माण झालेल्या समस्येबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मासेमारी हंगाम सुरू होण्यापूर्वी गाळ काढला नाही, तर संपूर्ण मासेमारी हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन खाडीतील गाळ काढण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी मुरूड सागर कन्या मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष मनोहर बैले, उपाध्यक्ष मनोहर मकु, प्रकाश सरपाटील, सुरेंद्र मकु, पांडुरंग आगरकर यांच्यासह कोळी बांधव उपस्थित होते.
