मासळीचे दक्षिणेकडून उत्तरेकडे पलायन; मच्छिमारांचे मोठे नुकसान
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
मुरूड आणि श्रीवर्धन तालुक्यातील आगरदांडा आणि दिघी समुद्र खाडीत अदानी ग्रुपकडून बंदर प्रकल्पाचे काम सुरू असून, उत्खननाचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असून, एकदरा येथील हनुमान मच्छिमार सोसायटी आणि मच्छिमारांनी त्याला आक्षेप घेतला आहे. पद्मजलदुर्ग परिसरात मोठ्या ड्रेजिंग जहाजाच्या यंत्रणेने या खाडीतील चिखल, गाळ, दगड बाहेर काढून खाडीची खोली वाढविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
मुरूड समुद्रात 12 वावच्या आत हे काम सुरू आहे. हा चिखल किंवा गाळ जवळपास टाकला जात असून, त्यामुळे समुद्रात मोठे उंचवटे निर्माण होऊन कोलंबीसारख्या मासळीला दक्षिणेकडून उथळ समुद्राकडे येण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे ही मासळी उत्तरेकडे म्हणजे ठाणे, पालघरकडे जात असून, येथील मच्छिमारांना ऐन हंगामामध्ये फक्त एक दिवसच कोलंबी मिळू शकली असून, डिझेलचा खर्चदेखील सुटू शकला नाही, अशी माहिती एकदरा येथील नौका मालक ललित मढवी यांनी सोमवारी दिली.
एकदरा येथील हनुमान मच्छिमार सोसायटीचे चेअरमन पांडुरंग आगरकर म्हणाले की, पारंपरिक मच्छिमार 12 वाव खोलीच्या पाण्यात मासेमारी करीत असतात. खाडीतील उपसला जाणारा चिखल अधिक खूप खोल समुद्रात टाकणे गरजेचे आहे. अन्यथा तो उथळ 12 वाव पाण्यात पुन्हा येऊन उंचवट्याचे अडथळे निर्माण होऊन मासेमारी पूर्णपणे ठप्प होऊ शकते. ड्रेजिंगने चिखल काढून आजूबाजूला चुकीच्या मार्गाने टाकला जात असल्याने जाळीदेखील फाटत आहेत. कोलंबीबरोबरच जाळ्यात चिखलदेखील येत असल्याची माहिती रामदास निशानदार यांनी दिली.
सतत वादळी परिस्थितीमुळे मच्छिमार आधीच भरडला गेलेला आहे. त्यामुळे आता आलेल्या मानवी संकटाला पायबंद घालावा. यासाठी राज्य सरकारने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालून सामान्य मच्छिमारांना न्याय द्यावा. रोजीरोटी हिरावून घेऊ नये.
पांडुरंग आगरकर
अध्यक्ष, मुरुड तालुका कृती समिती