। मुंबई । वृत्तसंस्था ।
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या हल्ला प्रकरणी अटकेत असेल्या अॅड गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
एसटी कर्मचार्यांपैकी काहींनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी अचानक मोर्चा नेते तिथे आक्रमकपणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करण्याबरोबरच चप्पलफेक देखील केली. अचानक घडलेल्या या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली होती. सोमवारी त्यांना पुन्हा या प्रकरणी झालेल्या सुनावणीत आता सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एसटी कर्मचार्यांना चिथावणी दिल्याच्या आरोपाखील वकील गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पवार यांच्या घरासमोर आक्रमकपणे आंदोलन केल्याप्रकरणी 110 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात सरकारी वकिलांसह सदावर्ते यांचे वकील तसंच एसटी कर्मचार्यांच्या वकिलांनी युक्तीवाद केला.
यावेळी सरकारची बाजू मांडणारे वकील प्रदीप घरत यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर दाखल झालेले कलम गंभीर असून त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. तर सदावर्तेंनीच कामगारांना शरद पवारांच्या घराबाहेर आक्रमकपणे आंदोलन करण्यास प्रोत्साहित केले असा आरोपही केला. तर त्याला प्रत्युत्तर देताना सदावर्ते यांचे वकील महेश वासवानी यांनी सादर केलेल्या एफआयआरमध्ये अनेक गोष्टी बदलून लिहिल्याचा आरोप केला आहे, तसंच सदावर्ते यांना ताब्यात घेताना नोटीसही देण्यात आली नाही, असा दावा केला.