सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक निवडणूक; महाविकास आघाडीचे समिकरण ठरले

शिवसेना 8, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 5 तर अपक्ष 1 जागा
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यातील राजकीय वर्तुळामधील शंकाकुशंका, चर्चाविचर्चा यांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेची असणारी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक निवडणूक महाविकास आघाडी सामौपचाराने लढविणार आहे.
यासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षासाठी जागावाटपाचे समीकरण अखेर निश्‍चित झाले आहे. यानुसार शिवसेना पक्षासाठी 8, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक 5-5 जागा तर अपक्षासाठी 1 जागेचे गणित महाविकास आघाडीतर्फे ठरविण्यात आले आहे. याबाबत शिवसेना खा. विनायक राऊत यांनी अधिकृत माहिती दिली आहे. जिल्हा बँकेचा 2015 ते 2021 या कालावधीतील कार्यअहवाल सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनमध्ये प्रकाशित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री उदय सामंत, आ. दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार राऊत म्हणाले, सतीश सावंत यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही जिल्हा बँक निवडणूक लढवत आहोत. सतीश सावंत कोण, असे 2019 मध्ये विचारणारे लोक आता घाबरले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे सतीश सावंत यांची बदनामी सुरू करण्यात आली आहे. तर पालकमंत्री उदय सामंत यांनी सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी मोठ्या फरकाने जिंकेल, असा विश्‍वास व्यक्त केला. त्याचप्रमाणे शिवराम जाधव यांचा वारसा सतीश सावंत चालवत आहेत. ते कुठेही इकडे-तिकडे जाणार नाहीत. विरोधक त्यांच्यात व शिवसेनेत वाद लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु तसे काही होणार नाही. आमचे सर्व उमेदवार तगडे व सहकाराची जाण असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

Exit mobile version