डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा

संघर्षपूर्ण लढतीनंतर सिंधूचे आव्हान संपुष्टात

| ओडेन्स | वृत्तसंस्था |

भारताच्या पी. व्ही. सिंधूचे डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. स्पेनच्या कॅरोलिन मरिनविरुद्ध 1 तास 13 मिनिटांच्या मॅरेथॉन लढतीत संघर्ष केल्यानंतरही सिंधूच्या पदरी निराशाच पडली. मरिनने ही लढत 21-18, 19-21, 21-7 अशी जिंकली. गेल्या आठवड्यात आर्कटिक खुल्या स्पर्धेतही सिंधूला उपांत्य फेरीतच पराभव पत्करावा लागला होता.पहिल्या गेमपासून सिंधू आणि मरिनमध्ये प्रत्येक गुणासाठी तीव्र स्पर्धा होती. अखेरच्या टप्प्यापर्यंत बरोबरीतच चाललेल्या गेममध्ये 18-18 अशा स्थितीत मरिनने सलग तीन गुण घेत बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये सलग गुण घेण्याची स्पर्धा दोघींमध्ये लागली होती.

सिंधूने 4-2 अशा स्थितीत सलग चार गुण घेत 8-2 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर 11-3 अशा पिछाडीवर मरिनने सलग सात गुण घेत 11-10 अशी पिछाडी भरून काढली. त्यानंतर 16-15 अशी स्थिती असताना सिंधूने चार गुणांची कमाई करत आघाडी 20-15 अशी भक्कम केली. पण, मरिनने पुन्हा चार गुण घेत 20-19 अशी पिछाडी कमी केली. या वेळी मात्र सिंधूने संधी गमावली नाही. एक गुण झटपट घेत तिने दुसरा गेम जिंकला. तिसऱ्या निर्णायक गेममध्ये मरिनच्या आक्रमकतेचा सामनाच सिंधूला करता आला नाही. मरिनने 3-2 अशा गुणस्थितीला सलग 11 गुणांची कमाई करताना थेट 14-2 अशी भक्कम आघाडी घेतली. मरिनने ही आघाडी अशीच राखताना नंतर सिंधूला केवळ तीनच गुण जिंकू दिले. दरम्यान, दोघींना पंचांनी पिवळे कार्डही दाखवले. सिंधू सर्व्हिसपूर्वी खूप वेळ घेत असल्याचे पंचांचे म्हणणे होते. तर प्रत्येक गुणानंतर मरिनने खूप जोरात जल्लोष केल्याने पंचांनी तिला कार्ड दिले.

Exit mobile version