प्रवाशांना बसमध्ये चढ-उतार करताना कसरत
| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
अनेक दिवसांच्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा मिळाला असून, सोमवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार सरींमुळे सायन-पनवेल महामार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेषतः बस थांब्यांसमोर पाणी साचल्याने प्रवाशांना बसमध्ये चढ-उतार करताना तसेच वाहने पकडण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनांच्या वेगावरही परिणाम झाला आणि काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू होती. पावसाच्या जोरदार सरींमुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर उष्म्याने त्रस्त झालेल्यांना मात्र या पावसाने मोठा दिलासा मिळाला.
हवामान खात्याने पुढील काही दिवसही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
विशेषतः नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला असून, सायन-पनवेल महामार्गावरील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
नवी मुंबईतील अनेक भाग जलमय
नवी मुंबईतील एपीएमसी परिसरासह विविध ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. सायन-पनवेल महामार्गावरील जुईनगर स्थानकाजवळील पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ झाली. सानपाडा, जुईनगर, नेरुळ ते सीबीडी बेलापूर या मार्गावर अनेक किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीचा फटका दैनंदिन प्रवाशांसह रुग्णवाहिकेलाही बसला असून, अत्यावश्यक सेवांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागला.
दैनंदिन प्रवाशांचे हाल
आठवड्याच्या दुसऱ्याच कामकाजाच्या दिवशी सुरू झालेल्या या पावसामुळे कार्यालयीन वेळेत मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय झाली. ठाणे आणि लगतच्या उपनगरांमध्येही मुसळधार पावसाचा प्रभाव जाणवला. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहने अत्यंत संथ गतीने पुढे सरकत होती. अनेक कार्यालयीन कर्मचारी वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने त्यांच्या प्रवासात मोठा विलंब झाला.
लोकल रेल्वे सेवेलाही फटका
मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी उपनगरीय रेल्वे सेवाही पावसामुळे विस्कळीत झाली. सलग दुसऱ्या आठवड्यात लाखो प्रवाशांना उशिरा धावणाऱ्या रेल्वे सेवेमुळे अडचणींचा सामना करावा लागला.
हवामान विभागाचा इशारा
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या काळात आणखी अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
