सायफनने पाणी घराघरात

ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी, दिवसाकाठी अडीच हजार लिटर पाणी
| चिपळूण । वृत्तसंस्था ।

चिपळूण तालुक्यातील चिवेली जाडेवाडी येथील ग्रामस्थांसाठी डोंगरातून 1 हजार मीटर अंतरावरून झर्‍याच्या पाण्यावर ग्रॅव्हिटीची नळपाणी योजना यशस्वीपणे राबवली गेली आहे. परिणामी येथील ग्रामस्थांच्या पाणीटंचाईचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. ही कामे शासकीय निधीतून होणे आवश्यक असताना दीप जनसेवा समितीच्या पुढाकाराने येथील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवला गेल्याने या समितीचे कौतुक होत आहे. चिवेली जाडेवाडी येथील डोंगरकपारीत असलेल्या पर्‍याचा जेथे उगम झाला आहे, तिथे असलेला झरा बारमाही वाहतो.

मुख्य वस्तीपासून 1 हजार मीटर अंतरावर असलेल्या या झर्‍यावरून ग्रॅव्हिटीने नळपाणी योजना यशस्वीपणे राबवली आहे. यासाठी येथील ग्रामस्थांनीही श्रमदान केले. या झर्‍यातून दिवसाकाठी सुमारे अडीच हजार लिटर पाणी मिळत आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी दीप जनसेवा समितीचे सुनील साळुंखे व त्यांचे बंधू दीपक व विलास साळुंखे यांना धन्यवाद दिले आहेत.

दीप जनसेवा समितीच्या माध्यमातून सुरवातीला आपल्या गावातील ग्रामस्थांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करून खर्‍या अर्थाने जनसेवेला सुरवात केली. यासाठी सुनील यांचे बंधू विलास व दीपक यांनी विशेष मेहनत घेतली. यानंतर मार्गताम्हाने, बामणोली, वाघिवरे, कौंढरताम्हाणे, गोंधळे, तनाळी, आंबेरे, उमरोली, अंजनवेल (गुहागर), काडवली (खेड), येथील सुमारे 2 हजार 500 ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे तर दीड हजार महिलांना साड्या वाटप करून सर्वांना दिलासा दिला. चिवेली फाट्यावर प्रवाशांसाठी बाकड्यांची व्यवस्था केली आहे. यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर झाली आहे. काडवली झगडेवाडी येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार स्मशानशेड स्ट्रक्चरसाठी मोठे सहकार्य केले आहे. यामुळे येथील स्मशानशेडचा वर्षानुवर्षे असलेला प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागला आहे. यासाठी येथील ग्रामस्थांचे श्रमदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.

Exit mobile version