साहेब, सुपीक जमीन नापीक होऊ देऊ नका; चोळे-खारगांधेच्या शेतकर्‍यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
शिहू बेणसे विभागातील खारगांधे-चोळे येथील आंबा नदी खाडीत वर्षानुवर्षे शासनाची फसवणूक करीत अनधिकृतरित्या वाळू उत्खनन होत असल्याची तक्रार येथील शेतकरी व ग्रामस्थांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाद्वारे सदर वाळू उत्खननाची सखोल चौकशी करून वाळू माफियांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. साहेब…..शेकडो एकर सुपीक जमीन नापीक होऊ देऊ नका, चोळे- खार गांधे च्या शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना साकडे घातले आहे.
सदर निवेदनाची प्रत पोलीस अधिक्षक रायगड, उपविभागीय अधिकारी पेण, तहसीलदार पेण, पोलीस निरीक्षक नागोठणे यांना देखील देण्यात आल्या आहेत. तक्रारी निवेदनावर लक्ष्मण पाटील, पोशा पाटील, नम्रता म्हात्रे, हिरा पाटील, हिराजी पांडुरंग म्हात्रे, मनोहर पाटील, म.शं.पाटील, किशोर घासे, चंद्रकांत बैकर, विजय बैकर, रमाकांत चंदने, धर्माजी पाटील, जनार्दन बैकर, विलास भुरे, लहू भुरे, प्रशांत लक्ष्मण पाटील, आदींसह शेकडो ग्रामस्तांच्या सह्या आहेत.
सदर निवेदनात नमूद केले आहे की, शेतीच्या बांध बंदीस्तीच्या बाजुने मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन होत असून बंदिस्ती धरमतर खाडीत तुटल्यामुळे शेतीत खार पाणी येत आहे. त्यामुळे सुपीक जमिनी नापिक होण्याच्या मार्गावर आहेत. सर्व वाळू उत्खनन राजरोसपणे सुरू असून वाहतुक देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. नुकसानग्रस्त शेतकरी यासंदर्भात आवाज उठविण्यासाठी पुढे आल्यास त्यांना धमकावले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शासनाने शेतकर्‍यांची सुपीक जमीन नापीक होऊ नये यासाठी आवश्यक तो पुढाकार घ्यावा, अन्यथा शेती वाचविण्यासाठी भविष्यात शेतकर्‍यांच्या झालेल्या उद्रेकास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा येथील संतप्त शेतकर्‍यांनी दिला आहे.

Exit mobile version