एससीईआरटीचे शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र; मुख्याध्यापक, शिक्षकांना 50 तासांच्या प्रशिक्षणाचे बंधन
| रायगड | सुयोग आंग्रे |
मतदार पुनरीक्षणाचे काम 17 ऑगस्टला संपले. त्याच दिवशी इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गांवरील शिक्षकांना 50 तासांचे एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रशिक्षण पूर्ण करायचे असल्याचे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) काढले आहे. 30 सप्टेंबरपूर्वी सर्व शिक्षकांना आता हे प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे.
इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गांवर अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना एआय साथी फॉर एज्युकेटर्स हा ऑनलाइन कोर्स करावा लागणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत सर्वच शिक्षकांना नोंदणी करावी लागणार आहे. अजूनही लाखो शिक्षकांनी कोर्ससाठी नोंदणी केलेली नाही, दुसरीकडे नोंदणी करूनही अनेकांनी प्रशिक्षण पूर्ण केलेले नाही. त्यामुळे आता राहिलेल्या शिक्षकांनी 31 ऑगस्टपूर्वी नोंदणी करावी आणि 30 सप्टेंबरपूर्वी कोर्स पूर्ण करावा लागणार आहे.
कोर्ससाठी चार तासांचे सीपीडी (प्रगतीशील विकास) प्रशिक्षण श्रेय निश्चित करण्यात आले आहे. तरी, आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना आवश्यक सूचना करून सर्व शिक्षकांची नोंदणी करून कोर्स वेळेत पूर्ण करून घ्यावे, असे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे यांनी काढले आहे. ते पत्र सर्व विभागीय उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) प्राचार्य, महापालिकेचे प्रशासनाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. मुख्याध्यापकांनाही प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. कोर्स पूर्ण झाल्यावर एक प्रश्नपत्रिका येते, त्यातील उत्तरे सोडवून ती सबमिट केल्यावर लगेचच निकाल येतो. त्यानंतर संबंधित शिक्षकास प्रशिक्षण पूर्ण केल्याचे ऑनलाइन प्रमाणपत्र मिळते.
30 तासांचे ऑनलाईन अन् 20 तासांचे ऑफलाईन प्रशिक्षण
इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गास शिकवणाऱ्या शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा लागणार आहे. शिक्षकांना एआयचा वापर सहजपणे करता यावा या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून सर्व शिक्षकांना 30 तास ऑनलाइन प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. 20 तास प्रशिक्षण वर्षभरात ऑफलाइन घ्यावा लागणार आहे.
रायगड जिल्ह्यातील स्थिती
प्रशिक्षणास अपेक्षित शिक्षक 16748
नोंदणी केलेले शिक्षक 6384
नोंदणी न केलेले शिक्षक 10364
नाव नोंदणीसाठी मुदत 30 ऑगस्ट 2026
प्रशिक्षणासाठी मुदत 30 सप्टेंबर 2026
विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना एआयची प्राथमिक माहिती असावी म्हणून पहिली ते बारावीच्या वर्गांवरील सर्व शिक्षकांसाठी हा कोर्स करावा लागणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या पत्रानुसार शिक्षकांनी कोर्ससाठी मुदतीत नोंदणी करून कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यात असणाऱ्या शिक्षक संख्येच्या तुलनेत नोंदणी करणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी आहे. नोंदणी न केलेल्या शिक्षकांनी तातडीने नोंदणी करून एआयचे प्रशिक्षण पूर्ण करावे.
रत्नप्रभा भालेराव,
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रायगड
