संजय राऊतांनी व्यक्त केला संताप
। मुंबई । प्रतिनिधी ।
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गावगुंडांकडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटल्याचे पाहायला मिळत आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटले. ज्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशी आणि न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, बीडमधील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. अशातच आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत यांनी या प्रकरणावरून सरकारवर तर निशाणा साधलाच आहे. परंतु, बीडमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थिती असल्याचा टोलादेखील त्यांनी लगावला आहे.
याबाबत राऊत म्हणाले की, बीडची परिस्थिती अशी आहे की, एका जिल्ह्यात राष्ट्रपती शासन लागू करावे. आपल्या घटनेत तशी तरतूद नाही. मी परिस्थिती सांगतो. तिथे सामाजिक राजकीय परिस्थिती गंभीर आहे. तिथे दंगल होईल, लोक रस्त्यावर येतील, अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी बीडला गेले पाहिजे. ते गृहमंत्री आहेत. त्यांच्या लाडक्या धनुभाऊला (मंत्री धनंजय मुंडे) घेऊन जावे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा आक्रोश जर या सरकारला दिसत नसेल तर हे सरकार माणुसकी शुन्य आहे. त्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही, असा राग राऊतांनी व्यक्त केला.