रायगड पोलिसांत खळबळ; सहा जणांचे निलंबन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

मुद्देमालात विसंगती; चुकीला माफी नाही, वरिष्ठांनी केले स्पष्ट

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकासह सहा जणांच्या कार्यपध्दतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. एका गुन्ह्यातील कामकाजात संशयास्पद कामगिरी केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी एलसीबीच्या या पोलिसांना दणका दिला आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 03 सी.पी. 1623 या क्रमांकाच्या महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीमध्ये 200 किलो वजनाचे एक लाख रुपये किंमतीचे तांबे व स्टील धातुचे तुकडे भरलेले असून ती गाडी रोहा तालुक्यातील वरसगांव कमानीजवळ उभी करून ठेवली होती. त्या गाडीतील माल संशयास्पद असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. पथकाने एक एप्रिल रोजी सकाळी छापा टाकला. त्यानंतर कोलाड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पालघर जिल्ह्यातील गांगडेपाडा येथील प्रमोदकुमार यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

एका बंद कंपनीतील माल चोरीला गेल्याचा गुन्हा माणगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. याप्रकरणातील काही मुद्देमाल माणगाव पोलिसांना जप्त केला होता. मात्र या मुद्देमालाची नोंद माणगावऐवजी कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची विसंगती उघड झाली. ही बाब पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या निदर्शनास आली. त्यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून प्राथमिक चौकशी सुरु केली. या चौकशीमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, पोलीस हवालदार संदीप पहेलकर, पोलीस शिपाई बाबासो पिंगळे, पोलीस शिपाई मोरेश्वर ओमले, पोलीस शिपाई ओंकार सोंडकर, पोलीस शिपाई लालासो वाघमोडे यांच्या कार्यपध्दतीवर गंभीर प्रश्न निर्माण केला. त्यांनी या सहाही जणांविरोधात तात्काळ निलंबनाची कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षकांसह अन्य निलंबीत अधिकारी व कर्मचारी यांची निलंबनाच्या कालावधीत नियंत्रण कक्ष अलिबागमध्ये हजेरी ठेवली आहे. या कालावधीत दररोज दोन वेळा नियंत्रण कक्षात हजेरी देणे. खासगी कामासाठी मुख्यालय सोडून बाहेर जायाचे असेल, तर त्यांनी कार्यालयाची आगावू लेखी परवानगी घेणे. निलंबन अधिकारी व कर्मचारी यांनी सरकारी किट, ओळखपत्रासह अलिबाग पोलीस ठाण्यात जमा करणे. निलंबित कालावधीत खासगी नोकरी, व्यापार केल्यास गैरकृत्याबद्दल दोषी ठरवून त्यांच्याविरोधात कार्यवाही केली जाईल. विभागीय चौकशीमध्ये अंतिम निर्णय होईपर्यंत निलंबित ठेवण्यात येईल, असे आदेश पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिले आहेत.

Exit mobile version