। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
शहरात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांनी चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. शुक्रवारी (दि.28) तुर्भे आणि एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार मुली बेपत्ता झाल्या होत्या. अद्याप त्यांचा शोध लागलेला नसतानाच पुन्हा दोन मुली रहस्यमयरीत्या गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. गेल्या काही दिवसांत नोंदविलेल्या या तक्रारींमुळे नवी मुंबईतील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
तुर्भे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 14 वर्षीय मुलगी घरातून बाहेर पडल्यानंतर परत न आल्याची तक्रार कुटुंबीयांनी नोंदवली आहे. परिसरातील सीसीटीव्ही, मार्गावरील हालचाली आणि मोबाईल लोकेशन्स यांचा तपास सुरू असून, एखाद्याने फूस लावून तिला पळवून नेल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, एनआरआय सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 वर्षीय मुलगी रहस्यमयरीत्या गायब झाली आहे. ती घरात एकटी असताना अचानक दिसेनाशी झाली असून तिचा मोबाईल बंद असल्याने शोधमोहीम अधिक आव्हानात्मक झाली आहे. या मुलीचे नाव यापूर्वी काही प्रकरणांत नमूद असल्याची नोंद पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे तपासाची दिशा अधिक व्यापक ठेवून पोलिसांनी छाननी सुरू केली आहे. रबाळे, एपीएमसी आणि कोपरखैरणे पोलीस ठाण्यांतही अशाच प्रकारे चार मुली घरा बाहेर पडल्यावर परत न आल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. बेपत्ता होण्याची कारणे अद्याप स्पष्ट नसून, अनेक प्रकरणांत कुटुंबीयांना कोणताही पुरावा किंवा हालचाल दिसून आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अल्पवयीन मुलगी हरवल्यास तातडीने अपहरणाचा गुन्हा नोंदविणे बंधनकारक असल्याने सर्व प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.







