। पनवेल । प्रतिनिधी ।
पोलीस असल्याचे सांगत सोने आणि रोख रक्कम लुटणाऱ्या सहा जणांना पनवेल शहर पोलिसांनी दि.1 ऑक्टोबर रोजी अटक केली. सागर पाटील रा. गवसे, कोल्हापूर, सुधाकर पाटील रा. कोल्हापूर, केतन सुरवसे रा. सांगली, भिकाजी पाटील रा. कोल्हापूर, सुनील शिंदे रा. सांगली, श्रीधर घाडगे रा. सांगली अशी त्यांची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की, 26 सप्टेंबर रोजी विराज शिरकांडे रा. करंजाडे हे सागर, शुभम, केतन असे ब्रिजा गाडी या वाहनाने मुंबई झवेरी बाजार ते करंजाडे, पनवेल येथे येत होते. करंजाडे रेल्वे फाटका जवळ सव्वा अकराच्या सुमारास आले असता चॉकलेटी रंगाच्या एर्टिगा कारसह थांबलेल्या इसमांनी पोलीस असल्याची बतावणी केली आणि त्यांच्याकडील सोने आणि रोख रक्कम चोरी करण्याच्या उद्देशाने कार अडवली. यावेळी अटल सेतूवरून 120 च्या स्पीडवरून येऊन गाडी थांबवण्यासाठी हात केला. मात्र, तुम्ही गाडी का थांबवली नाही असे बोलून त्यांनी चौघांना फायबर काठीने मारहाण केली. आणि गाडीतील सोने, रोख रक्कम, मोबाईल ठेवण्यासाठी असलेल्या बॅग व मोबाईल गाडीमध्ये ठेवून त्यांच्याकडील एर्टिगा कारमध्ये बसवले आणि अटल सेतूकडे जाणाऱ्या रस्त्याने घेऊन जाऊन गाडीत शिवीगाळ आणि मारहाण करून मोबाईल फोन, घड्याळ, रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर रस्त्यावर सोडून ब्रिजा कार निर्मनुष्य ठिकाणी घेऊन जाऊन कारमध्ये असलेल्या बॅग, रोख रक्कम, सोने, मोबाईल असा एकूण 34 लाख 28 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी यातील सहा जणांना अटक केली. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.







