नवी मुंबईत अग्नितांडव; सहा जणांचा होरपळून मृत्यू

मृतांमध्ये सहा वर्षांच्या मुलीचा समावेश

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

राज्यभरात दिवाळी उत्साहात साजरी होत असताना नवी मुंबईकरांसाठी मंगळवारची सकाळ दोन अत्यंत वाईट बातम्या घेऊन उजाडली. नवी मुंबईतील कामोठे आणि वाशी परिसरात लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा मृत्यू झाला. यापैकी वाशी येथील रहेजा रेसिडन्सी या इमारतीला लागलेल्या आगीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये एका सहा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. तर कामोठ्यातील आगीत मायलेकीचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीसणात ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

रहेजा रेसिडेन्सीमध्ये मध्यरात्री 12.40 च्या सुमारास दहाव्या मजल्यावर ही आग लागली. या दुर्घटनेत सुंदर बालकृष्णन (44), पूजा राजन (39)आणि त्यांची सहा वर्षांची मुलगी वेदिका यांचा होरपळून मृत्यू झाला. याशिवाय, आगीमध्ये आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. 84 वर्षांच्या कमला हिरल जैन यांना आगीत आपला जीव गमवावा लागला. कमला जैन या आजारी असल्यामुळे बिछान्यालाच खिळून होत्या. त्यामुळे आग लागल्यानंतर त्यांच्या घरातील इतर सदस्य बाहेर पडले. मात्र, कमल जैन यांना उठून बाहेर जाता आले नाही. अग्निशमन दल याठिकाणी आल्यानंतर त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली. अग्निशमन दलाचे जवान इमारतीच्या आत दाखल होऊन दहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. मात्र, याठिकाणी प्रचंड धूर पसरल्याने कमला जैन यांना लगेच बाहेर काढता आले नाही. त्यामुळे कमला जैन यांचा आगीत होरपळून आणि धुराने गुदमरुन जागेवरच मृत्यू झाला.

तर नवी मुंबईतील कामोठे येथील सेक्टर 36 मध्ये आंबे श्रध्दा सहकारी सोसायटीतही मंगळवारी (दि.21) सकाळीआग लागली होती. आंबे सोसायटीमधील दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच इमारतीमधील सर्व नागरिक बाहेर पडले. सोसायटीतील नागरिक इमारतीमधून बाहेर पडेपर्यंत ही आग वेगाने पसरली होती. तोपर्यंत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी इमारतीवर चढून तातडीने आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा सुरु केला. इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील घरातील तीन सदस्य बाहेर पडले. मात्र, रेखा शिसोदिया आणि त्यांच्या मुलगी पायल शिसोदिया आतमध्येच अडकून पडले होते. या दोघांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आग विझवून आतमध्ये जाईपर्यंत या दोघांचाही होरपळून मृत्यू झाला. या दोघी आत कशा अडकून राहिल्या, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, ऐन दिवाळसणात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने कामोठे परिसरात शोककळा पसरली आहे.

Exit mobile version