मालकाची मुजोरी; बाळंतीण महिलांवर वीटभट्टीवर काम करण्याची बळजबरी
। नेरळ । प्रतिनिधी ।
माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना कर्जत तालुक्यात समोर आली आहे. वीटभट्टीवर काम करून देण्यासाठी आगाऊ पैसे घेतल्याचा राग मनात धरत दोन नवजात बालकांसह दोन चिमुरड्या मुली आणि दोन महिलांचे असे तब्बल सहा जणांचे अपहरण केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत आदिवासी कातकरी समाजाच्या कार्यकर्त्या मदतीला धावून आल्याने नेरळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी आवाज उठवण्यात यश आले.
नेरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणगाव आदिवासी वाडी येथील फिर्यादी दर्शन विजय मिरकुटे यांनी वीटभट्टीवर कामासाठी समीर नजे व अब्दुला नजे (वडील व मुलगा, रा. दामत) यांच्याकडून 27,500 आगाऊ घेतले होते. मात्र घरातील दोन्ही पत्नींची प्रसूती झाल्यामुळे दर्शन मिरकुटे यांना कामावर जाता येत नसल्याने आरोपी त्यांच्यावर पैसे परत देण्याचा दबाव टाकत होते. पैसे देणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर मिरकुटे घरी नसताना आरोपी नजे पिता-पुत्रांनी घरातून थेट दोन पत्नी, नवजात दोन बालके यांना घरातून घेऊन गेला. धक्कादायक म्हणजे या दोन्ही महिलांची केवळ 15 दिवसांपूर्वीच प्रसूती झाली होती, तर मुलींचे वय 3 आणि 4 वर्षे आहेत. आरोपींनी पीकअप टेम्पोमध्ये मुली व प्रसूत महिलांना आजी आजोबांच्या डोळ्यासमोरून घेऊन जात दामत येथील पडीक घरात संपूर्ण सात दिवस कामावर ठेवून वीटभट्टीवर काम करण्यास भाग पाडले.
या घटनेची माहिती मिळताच नेरळ भागातील आदिवासी कार्यकर्त्यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे धाव घेतली आणि त्यांनी याबाबत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून तात्काळ वीटभट्टी येथे जाऊन संबंधित लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.







