भालीवडीतील सहा विद्यार्थीनींना कोरोनाची लागण; एनडी स्टुडिओ हिटलिस्टवर

। नेरळ। वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढत असल्याचे चित्र आहे. कारण कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे कर्जत भिलवले येथील एनडी स्टुडिओमधील काम करणारे तंत्रज्ञ आणि कर्मचारी अशा तब्बल 17 जणांना कोरोना झाला आहे. याशिवाय भालीवडी आश्रमशाळेतील आणखी सहा विद्यार्थीनींना कोरोनाची लागण झाली आहे. तर कशेळे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

मात्र आदिवासी विद्यार्थी यांचे वास्तव्य असलेल्या आश्रमशाळेतील सात विद्यार्थीनी यांना कोरोना झाला निवासी शाळेत येथे शिक्षण देण्यासाठी येणारे शिक्षक हे बाहेरून प्रवास करून येत असल्याने विद्यार्थी कोरोनाग्रस्त होत आहे,त्यामुळे बाहेरून प्रवास करून येणार्‍या शिक्षकांच्या प्रवासावर बंधने आणावीत अशी मागणी आदिवासी विकास विभागाचे पेण प्रकल्प नियोजन समिती अध्यक्ष दत्तात्रय सुपे यांनी केली आहे.

मोठ्या प्रमाणावर चित्रपट, तसेच दूरचित्रवाहिनीवरील मालिका आणि जाहिरात यांचे चित्रीकरण होत असलेल्या कर्जत जवळील एनडी स्टुडिओ मध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. प्रशासन कर्जत नावाने ओळखले जाणारे परंतु भिलवले येथे असलेला हा स्टुडिओ खालापूर तालुक्यात येत आहे. त्यामुळे वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रशासन एनडी स्टुडिओबद्दल काय निर्णय घेणार याकडे लक्ष्य लागले आहे. तर कर्जत तालुक्यात पाच ठिकाणी आदिवासी आश्रमशाळा असून, यामध्ये दहावी आणि बारावीचे विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत.त्यातील भालीवडी येथील मुलींच्या आश्रमशाळेतील आणखी सहा मुलींना या कोरोनाची लागण झाली आहे.

या आश्रमशाळा ज्या आदिवासी विकास विभाग यांच्याकडून होत असतो,त्या विभागाच्या पेण प्रकल्पाचे प्रमुख दत्तात्रय सुपे यांनी आश्रमशाळेत शिकणारे विद्यार्थी यांच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. याबाबत पेण प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांना पत्र देऊन हा कोरोना कसा विद्यार्थ्यांना झाला याबद्दल चौकशी करण्याची विनंती केली. यानुसार आज 13 जानेवारी रोजी पेण प्रकल्प अधिकारी अहिरराव यांनी सहायक प्रकल्प अधिकारी शरमकर आणि तेथील शिक्षण विस्तार अधिकारी यांना पाठवले असून, माहिती घेण्याची सूचना केली आहे.

Exit mobile version