म्हसळ्यातील सहा गावे दरडीच्या छायेत

तहसीलदार, बीडीओंनी केली पाहणी

| म्हसळा | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एकूण सहा गावे यावर्षी दरडीच्या छायेत असून, सर्वाधिक गावे ही खाडी किनारपट्टीलगत आहेत. गेले अनेक वर्षे म्हसळा तालुक्यात होत असलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर भूवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.

तालुक्यातील मारियम खार, लिपणी, महमद खनिखार, वावे या गावांमध्ये 1994 मध्ये पहिली दरड कोसळल्यानंतर तालुक्यात नैसर्गिक आपत्तीला सुरुवात झाली. 2005 च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये म्हसळा तालुक्यातील वरील गावे आणि नव्याने समाविष्ठ झालेली सकलप आणि घोणशे गावांमध्ये दरड कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. जिओ लॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या वैज्ञानिकांनी गावांचे सर्व्हेक्षण करण्यास सुरुवात केली होती. वैज्ञानिकांकडून संभाव्य दरडग्रस्त गावांची यादी प्रसिद्ध केली जाते. त्यानुसार म्हसळा तालुक्यातील सहा गावे ही दरडीच्या छायेत आहेत. या गावांचे वर्ग 1, वर्ग 2 आणि वर्ग 3 अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहेत. वर्ग 1 म्हणजे धोकादायक, वर्ग दोन अतिधोकादायक आणि वर्ग 3 सौम्य धोकादायक अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे.

यासाठी धोक्याचा इशारा म्हणजेच खाणकाम आणि उत्खननावर निर्बंध घालण्यात यावेत, डोंगर उतारावर वृक्ष तोडण्यास बंदी घालण्यात यावी, पावसाळ्यापूर्वी डोंगर उतारावर सैल झालेले दगड हटवण्यात यावेत, डोंगर उतारावरील पाण्याचा निचरा वेगाने व्हावा यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, त्याचप्रमाणे दरडरोधक संरक्षक भिंतीची उभारणी करण्यात याव्यात. मागील काही वर्षांचा अनुभव पहाता तालुक्याचे तहसीलदार समीर घारे, गटविकास अधिकारी एम.के. जाधव यांनी आपल्या सहकार्‍यांसाह दरडग्रस्त गावांना भेटी दिल्या. अतिवृष्टीमुळे अशा प्रकारचे प्रसंगी घाबरून न जाता धैर्याने आणि ग्रामस्थांच्या एकीने यावर तातडीचे उपाय सुरु करावेत, त्यासाठी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास आपत्कालीन तुमचे सहकार्य घ्यावे, असे समीर घारे यांनी सांगितले.

ग्रामस्थांचे स्थलांतर हाच उपाय
अतिवृष्टी झाल्यास धोकादायक गावांना स्थलांतर करण्याच्या नोटिसा दिल्या जातात. याकरिता सुरक्षित ठिकाणी असलेल्या शाळा व मंदिरांमध्ये ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात येते व तिथे त्यांना काही दिवस सुविधा पुरविल्या जातात. तर, काही ठिकाणी कायमस्वरूपी निवारा शेड बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Exit mobile version