रासायनिक मिश्रणावरील दाब वाढल्याने दुर्घटना; तिघे गंभीर, कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
| महाड | प्रतिनिधी |
महाड औद्योगिक क्षेत्रातील दुर्घटनांचे सत्र सुरूच असून, गुरुवारी (दि. 8) सायंकाळी ॲस्ट्रॉईड लाईफ सायन्सेस कंपनीत रासायनिक मिश्रणावरील दाब वाढल्याने वायुगळतीची घटना घडली. या दुर्घटनेत सहा कामगार जखमी झाले असून, त्यापैकी तिघांना भाजल्याने गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने महाड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे महाड औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महाड औद्योगिक क्षेत्रातील बी-19 या भूखंडावरील ॲस्ट्रॉईड युनिट-1 या कंपनीत सल्फ्युरिक आम्ल, डीएसपी आणि नायट्रिक आम्ल यांचे मिश्रण करण्यात आले होते. या मिश्रणाला गरम करण्याची प्रक्रिया सुरू असताना यंत्रणेतील उपयुक्तता पुरवठा खंडित झाला. त्याचवेळी मिश्रणाचे तापमान 100 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढल्याने त्यामध्ये दाब निर्माण झाला. परिणामी, रिॲक्टरचे झाकण उडाले आणि मिश्रण बाहेर फेकले गेले. या प्रक्रियेतून वायू तयार होऊन कंपनीत गळती झाल्याने सहा कामगार जखमी झाले.
या घटनेत निलेश खरे-पाटील (44, रा. डोंबिवली) आणि राजकिशोर राम (56, रा. बिरवाडी) यांना हात, चेहरा आणि डोक्याला भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत. तुकाराम पालकर (42) यांना चेहऱ्यावर, नरेंद्र गोलमांड (30) आणि हेमंत घेवडे (31, रा. बिरवाडी) यांना दोन्ही हातांवर, तर अरुण काळगीडे (36, रा. माटवण) यांना पायावर खाज सुटण्याचा त्रास झाला.
दरम्यान, कंपनीतून वायुगळती झाल्यानंतर परिसरातील अन्य कंपन्यांमधील कामगारांनाही डोळ्यांची चुरचुर होणे तसेच नाक आणि तोंडावाटे श्वास घेण्यास त्रास होणे, अशा तक्रारी जाणवल्याची चर्चा कामगारांमध्ये आहे. त्यामुळे या वायुगळतीचा परिसरातील इतर कामगारांवरही परिणाम झाला का, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
महाड एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक अनंत रावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सहा कामगार जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. महाड औद्योगिक क्षेत्रात वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कंपन्यांमधील यंत्रणा, रासायनिक प्रक्रियांवरील नियंत्रण आणि सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.





