। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कळंब येथे तक्रारदार यांच्या जागेची मोजणी करण्याकरिता दीड लाखाची लाच मागणार्या आरोपी लोकसेवक बालाजी रावसाहेब राऊत (वय 32) भुकरमापक भूमी अभिलेख कर्जत जिल्हा रायगड (वर्ग-3) याच्या निवासस्थानी सुमारे सोळा लाखांची रोकड सापडली आहे.
कर्जत तालुक्यातील कलंब येथील तक्रारदार (वय 50) यांच्या जागेची मोजणी करण्यासाठी आरोपी लोकसेवक बालाजी रावसाहेब राऊत यांनी दीड लाखाची लाच मागितली.मात्र तडजोडीअंती पंचवीस हजार रुपयांवर तडजोड झाली.कर्जत येथील कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून दुपारी साडे तीनच्या सुमारास पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना अलिबाग येथील लाच लुचपत विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक रणजित गलांडे, पोलिस हवालदार कौस्तुभ मगर, पोलिस नाईक विवेक खंडागळे, महिला पोलिस नाईक स्वप्नाली पाटील यांच्या पथकाने (दि.13 जुलै) रंगेहाथ पकडून पंचवीस हजारांची लाचेची रक्कम त्याच्याकडून हस्तगत केली होती.तद्नंतर लाचखोर बालाजी राऊत यांच्या कर्जत येथील निवासस्थानी झाडझडती घेतली असता त्यांच्या भाड्याच्या घरी तब्बल सोळा लाखांची रोकड सापडली आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखालीरायगड लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक सुषमा सोनवणे यांच्या सूचनेनुसारपोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. त्याच प्रमाणे घर झडती पोलीस उप अधीक्षक सुषमा सोनावणे, पोलीस निरीक्षक नवनाथ चौधरी, पोलीस हवालदार अरुण करकरे, पोलीस हवालदार विनोद जाधव, पोलीस नाईक जितेंद्र पाटील याच्या पथकाने घेतली होती.