पोलादपूर शहरात सहावा स्कायवॉक

| पोलादपूर | प्रतिनिधी |

पोलादपूर शहरातील श्री काळभैरवनाथ मंदिर आणि प्रभातनगर पूर्व दरम्यान बुधवारी (दि.1) स्कायवॉक उभारण्यासाठी गर्डर टाकण्याचे काम जलदगतीने सुरू झाले आहे. त्यामुळे हा स्कायवॉक पूर्ण झाल्यानंतर पोलादपूर शहरातील सहावा पुल ठरणार आहे.

पोलादपूर शहरात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणा दरम्यान महामार्ग अंडरपास म्हणजे जमिनीखालून मध्यभागी 35 फूट खोल खंदकातून नेण्यात आला आहे. त्यामुळे पोलादपूर शहराचे दोन भाग झाले आहेत. त्यामुळे पोलादपूर शहरातील मूळ वस्तीसह तांबडभुवन, साईनाथनगर, घाटे आवाड, सैनिकनगर, गोकुळ नगर, जाखमातानगर, प्रभातनगर पश्चिम, नव्याने उभारण्यात आलेल्या मंगलमूर्ती व समृद्धी अपार्टमेंट या लोकवस्त्यांसाठी तांबडभुवन, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, पोलीस ठाण्याची जुनी इमारत, एसटी बस स्थानकातून बसेस बाहेर पडण्याचा मार्ग व बसेस स्थानकात जाण्याचा मार्ग तसेच पाचवा पुल गोकुळ नगर रस्त्याकडे जाण्यासाठी उभारण्यात आला. मात्र, तरीदेखील श्री काळभैरवनाथ मंदिर आणि प्रभातनगर पूर्व येथील लोकवस्ती व शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी स्कायवॉक उभारण्यासाठी लोकनेत्यांनी संबंधितांनी निवेदने देऊन पाठपुरावा केला. त्यानंतर आता या स्कायवॉकच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी स्कायवॉकसाठी उभारलेल्या तीन पिलर्सवर आडवे चार गर्डर टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. त्यानंतर हे चार गर्डर पिलर्सवर एकसंध करण्यासाठी काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वात शेवटी या स्कायवॉकवर जाण्या-येण्यासाठी जिन्यांचे बांधकाम केले जाणार आहे. सद्यस्थितीत हा स्कायवॉक मंगलमूर्ती अपार्टमेंट आणि प्रभातनगर पूर्व या लोकवस्तीला जोडणारा दुवा ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version