रस्त्यासाठी शेकापचा एल्गार

अलिबाग-रामराज-रोहा रस्त्यासाठी रास्ता रोको
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग रामराज रस्त्याची आजघडीला अत्यंत भयावह दुरावस्था झाली आहे. खड्डे, दगडगोटे, चिखल यामुळे या जीवघेण्या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण होऊन मार्ग सुस्थितीत यावा व जनतेचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी बुधवार दि. 13 ऑक्टोबर रोजी शेेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यांसदर्भात शेकाप वर्धापनदिनी सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी इशारा देत टक्केवारीत अडकलेल्या अलिबाग-रामराज-रस्त्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
सकाळी 9 वाजता खानाव येथे पुकारण्यात आलेल्या या आंदोलात सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने नागरिकांना हॉस्पिटल, कोर्ट, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तसेच इतर सरकारी, निमसरकारी व खाजगी कार्यालयात सतत काही ना काही कामासाठी जावे लागते. अलिबाग रामराज रस्त्याची आज जी दुरावस्ता झाली आहे. या मार्गावरून चारचाकी तर सोडा, दुचाकी चालवणे सुद्धा कठीण झाले आहे. अलिबाग येथे नोकरी धंद्याच्या निमित्ताने रोज अप-डाऊन करणार्‍यांची स्थिती अगदी केविलवाणी झाली आहे.
कुटुंबाच्या उदर निर्वाहासाठी कोणत्याही विपरीत परिस्थितीत त्यांना रोज नाईलाजास्तव अलिबाग गाठावेच लागते. बर्‍याच जणांना अत्यंत खराब रस्त्यावरून ये-जा करून मणक्यांचे व कमरेचे विकार सुरु झाले आहेत. अलिबाग – रोहा हा रस्ता नागरिकांची जीवन वाहिनी आहे. नागरिकांना व्यवसाय, नोकरी, शिक्षण, कृषी, कोर्ट कचेरी आणि सरकारी कार्यालयातील कामे इत्यादिसाठी अलिबाग व रोहा या दोन्ही शहरांचा संबंध येतो, मुख्यत्वेकरून अलिबागला रोज अप – डाऊन करणार्‍या नागरिकांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. या रस्त्यावरून दुचाकी, रिक्षा, चारचाकी खाजगी वाहनांबरोबर सरकारी वाहनांची वर्दळ खूप मोठ्याप्रमाणात आहे. रस्त्याच्या कामामध्ये राजकारण करुन शेकापने मंजुर करुन आणलेल्या रस्त्याची वर्क ऑर्डर वेळेवर न दिल्याने सदर रस्त्याचे काम रखडले आहे. मात्र आता टक्केवारीत अडकलेल्या या रस्त्याचे काम त्वरीत सुरु न केल्याने शेकाप स्टाईलने आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

Exit mobile version