सभापतीपदी रमेश मोरे, तर उपसभापतीपदी अल्लाउद्दीन सनगे
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन कार्यक्षेत्र असलेल्या माणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा पुन्हा एकदा फडकला असून सभापतीपदी शेकापचे माणगाव तालुका चिटणीस रमेश पांडुरंग मोरे तर उपसभापतीपदी श्रीवर्धन तालुक्यातील जसवली गावचे शेकापचे जेष्ठ नेते अल्लाउद्दीन उमर सनगे हे विराजमान झाले आहेत. या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच शेकापचे विधानपरिषदेचे आ. जयंतभाई पाटील यांनी दोघांचे दूरध्वनीवरून अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच माजी आ. पंडितशेठ पाटील यांनी माणगाव येथे येऊन नवनिर्वाचित सभापती रमेश मोरे व उपसभापती अल्लाउद्दीन सनगे यांचे अभिनंदन केले. या दोघांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
माणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थेची सन 2022-23 ते 2027-28 या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक दि. 30 एप्रिल रोजी बिनविरोध संपन्न झाली. या संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करीत 18 पैकी 12 जागांवर शेकापचे संचालक हे बिनविरोध निवडून आले असून चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तर दोन जागांवर शिवसेना शिंदे गटाचे संचालक निवडून आले आहेत. त्यानंतर या संस्थेच्या सभापती व उपसभापती यांची निवडणूक गुरुवार दि.18 रोजी सकाळी संस्था कार्यालय माणगाव याठिकाणी निवडणुकीचे प्राधिकृत अधिकारी अमोल निरडे यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली. या निवडणुकीत सभापती पदासाठी शेकापचे रमेश पांडुरंग मोरे यांनी तर उपसभापती पदासाठी शेकापचे अल्लाउद्दीन सनगे यांनी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीसाठी उपस्थित असलेल्या शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाच्या सर्व संचालकांनी शेकापचे रमेश मोरे व अल्लाउद्दीन सनगे यांना पाठिंबा दिल्याने सभापतीपदी एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल असल्याने शेकापचे रमेश मोरे हे सभापतीपदी तर उपसभापती पदासाठी एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल असल्याने शेकापचे अल्लाउद्दीन सनगे हे बिनविरोध निवडून आल्याचे निवडणुकीचे प्राधिकृत अधिकारी अमोल निरडे यांनी जाहीर केले.
या संस्थेच्या निवडणुकीसाठी अल्लाउद्दीन सनगे, महेश सुर्वे, हसनमिया बंदरकर, नरेश दळवी, दिलीप उतेकर, कौस्तुभ धामणकर, रमेश मोरे, गौरी पयेर, नाझनीन राऊत, सुषमा रिकामे, विनायक गिजे, स्वप्नील दसवते, चंद्रकांत गोरेगावकर, प्रमोद घोसाळकर, संतोष मेथा हे संचालक उपस्थित होते. तर अंकुश रघुनाथ गोळे, परशुराम चंदर पवार, सचिन नंदाकर किर हे संचालक अनुपस्थित होते. उपस्थित सर्व संचालकांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी राजिप अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हाचिटणीस आस्वाद पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती चित्रा पाटील यांनी दूरध्वनीवरून रमेश मोरे व अल्लाउद्दीन सनगे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शेकापचे ज्येेष्ठ नेते अस्लम राऊत, राजीव साबळे, विपुल उभारे, देवेंद्र गायकवाड, सचिन बोंबले, मधुकर अर्बन, सुधीर पवार, संतोष खडतर, माणगाव तालुका शेकाप कार्यालयीन चिटणीस राजेश कासारे, विलास गोठल, निजाम फोपळूणकर, सुशील दसवते, नितीन वाघमारे, योगेश मोरे, माणगाव आरडीसी बँकेचे व्यवस्थापक, कर्मचारी, कृषी उत्पन्न बाजार समिती माणगाव व्यवस्थापक व कर्मचारी, शेकापचे कार्यकर्ते, महिला आघाडी कार्यकर्त्या त्यांचे अभिनंदन केले.