आ. जयंत पाटील यांच्याकडून पोलिसांना गणपतीचं गिफ्ट

पोलिसांच्या मुलांना देणार कमी व्याजदरात शैक्षणिक कर्ज

| अलिबाग | प्रतिनिधी |
पोलिसांचे काम सोपे नाही. रात्रंदिवस, सण-उत्सवात त्यांना कर्तव्य बजावावे लागते. कुटूंबाकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळत नाही. पोलिसांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहोचले पाहिजे. यासाठी त्यांच्या मुलांना रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कमी व्याजदरात शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देण्याची घोषण शेकापचे आ. जयंत पाटील यांनी केली.

अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणरायाच्या आरतीचा मान शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांना शुक्रवारी (दि.22) देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, कमलाकर वाघमोडे, माजी नगरसेवक अनिल चोपडा, ॲड. सचिन जोशी आदी मान्यवरांसह पोलीस मुख्यालयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात औद्योगिकरण वाढत आहे. पोलिसांच्या मुलांना या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. माझ्याकडून जेवढे सहकार्य करता येईल तेवढे करेन. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज पोलीस मुख्यालयात येण्याची संधी मिळाली. परिसरातील सुशोभीकरण, वेगवेगळ्या सुविधांयुक्त कामकाज पाहून खुप आनंद झाला. पोलिसांचे काम आधुनिक पध्दतीने झाले पाहिजे. जिल्ह्यातील पोलीसांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, अशा पध्दतीने एक मॉडेल म्हणून पोलीस ठाणे उभारण्याची गरज आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांना चांगली घरे मिळाली पाहिजेत. ही माझी भुमिका कायमच राहिली आहे. याबाबत अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची मुले आयएएस, आयपीएस दर्जाचे अधिकारी झाले पाहिजेत. आमदार म्हणून पोलीसांच्या पाठीशी कायम राहीन, असेही आ. जयंत पाटील यांनी सांगितले.

पोलिसांची घरे 500 स्क्वे.फुट असावी
पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता, कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करतात. परंतु पोलीस कर्मचाऱ्यांना हक्काची घरे मिळत नाही, ही मोठी चिंताजनक बाब आहे. लहानशा खोलीपेक्षा कमीत कमी 500 स्क्वेअर फुटापर्यंतची पोलीसांना घरे मिळाली पाहिजे. जेणेकरून त्यांना कुटूंबासमवेत राहता येईल. याबाबत आमदार म्हणून कायम प्रयत्नशील असल्याचेही, आ. जयंत पाटील यांनी सांगितले.

भाईंची आक्रमकता लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी; पोलीस अधीक्षकांकडून आ. जयंत पाटील यांचे कौतूक
तीन वर्षे पोलीस दलात प्रशिक्षण सेंटरमध्ये काम करीत असताना, सहा अधिवेशनात जाण्याची संधी मिळाली आहे. गॅलरीमध्ये बसून आमदारांची भाषणे ऐकली आहेत. विधान परिषदेमध्ये सर्वात जास्त प्रश्न मांडणारे आमदार जयंत पाटील आहेत. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर लवकरच योग्य उपाययोजना करण्यात येणार आहे. तळागाळापर्यंत काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळावी, यासाठी मेळावा भरविला जाणार आहे. तसेच अद्ययावत असे पोलीस ठाणे व्हावे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी स्मार्ट पोलीस ठाणे ही योजना राबविली जाणार आहे. डिसेंबरपर्यंत सर्वच पोलीस ठाणे स्मार्ट होतील, अशी अपेक्षा आहे. तक्रारदाराला पोलीस ठाण्यात आल्यावर सुरक्षित वाटले पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जातील. आ. जयंत पाटील यांची आक्रमकता काय आहे, हे सर्वांनाच माहित आहे. भाईंनी लोकांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी आक्रमकता दाखविली आहे. वेळप्रसंगी शाबासकी व स्तुतीदेखील केली असल्याचे गौरोद्गार पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी काढले.

Exit mobile version