। अलिबाग । प्रतिनिधी ।
आरसीएफच्या प्रकल्पग्रस्त कर्मचार्यांना न्याय देण्यात शेकाप यशस्वी झाला आहे. प्रकल्पग्रस्तांबरोबरच कंपनीत काम करणार्या कर्मचार्यांच्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, ही शेकापची ठाम भुमिका आहे. भविष्यातही शेकापचा कर्मचार्यांना कायम पाठिंबा राहिल, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले.शेकापचे कार्यकर्ते तथा आरसीएफ कंपनीतील कर्मचारी संजय माळी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन व रक्तदान शिबीर सोहळा शुक्रवारी (दि.5) आयोजित केला होता. त्यावेळी आ. जयंत पाटील बोलत होते.
याप्रसंगी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अलिबाग नगरपरिषदचे माजी गट नेते प्रदिप नाईक, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील, विजय कवळे, द्वारकानाथ नाईक, सुनील थळे, थळचे सरपंच पत्रे, बोरीस गुंजीसच्या सरपंच पाटील, संतोष म्हात्रे, बाळा पडवळ, आरसीएफ कंपनीचे विनायक पाटील, देशपांडे, देशमुख आदी मान्यवरांसह, विकास घरत, प्रमोद घासे, सुरेश घरत, राजू माळी, संतोष माळी आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी, शेकाप कार्यकर्ते, आरसीएफ कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, संजय माळी यांचे कुटूंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापुढे मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील म्हणाले, थळ या ठिकाणी उभारलेला आरसीएफ प्रकल्प कमी कालावधीत निर्माण होणारा आशिया खंडातील पहिला प्रकल्प आहे. पुरेसे शिक्षण नसताना या प्रकल्पाने अनेकांना रोजगाराचे साधन खुले करून दिले आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक स्त्रोत निर्माण झाला आहे. संजय माळी यांनी पक्षाची कामे करीत असताना, सर्वसामान्यांच्या हिताचा विचार कायमच केला आहे. गोरगरींबांसाठी अनेक कामे त्यांनी केली आहेत. आरसीएफ कंपनीत काम करताना कंपनीचे हित साधण्याबरोबरच कामगारांसोबत ते कायमच राहिले आहेत. सर्वसामान्यांचे हित जपणारे संजय माळी यांच्यासारखे पुढारी निर्माण होण्याची गरज आहे. या भागातील अनेक तरुण इंजिनिअर झाले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसायिक शिक्षण त्यांनी घेतले आहे. आरसीएफच्या दुसर्या टप्प्यातील होणार्या प्रकल्पामध्ये या तरुणांचा समावेश करणे गरजेचे आहे. प्रकल्प उभारणीला काही वर्ष लागणार आहेत. त्यानुसार येथील तरुणाईला प्रशिक्षण देऊन सक्षम उभे करण्याचे काम करावे ही विशेष मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.
संजय माळी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
संजय माळी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आ.जयंत पाटील यांनी संजय माळी यांच्यासह कुटुंबियांचा सन्मान केला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी उपस्थित राहून संजय माळी यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आरसीएफ कंपनीतील अधिकारी व कर्मचार्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तरुणांसह अनेकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले.