चित्रलेखा पाटील यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जूनी पेन्शन लागू करा, चौथ्या वेतन आयोगापासून वेतन श्रेणीत असलेली तफावत दुर करून सुधारित वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे अशा अनेक मागण्यांसाठी जय महाराष्ट्र शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पाठींबा देण्यात आला आहे. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी बुधवारी (दि.25) आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत सोबत राहू, असे आश्वासनही चित्रलेखा पाटील यांनी दिले.
जिल्हा परिषदेमधील लिपीक व लेखा संवर्गातील कर्मचारी अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने सेवा बजावत आहेत. चौथा वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, तसेच पदोन्नतीतील अडचणी दूर करणे या त्यांच्या मागण्या पूर्णपणे रास्त आणि न्याय्य आहेत. शासनाने कर्मचाऱ्यांच्या भावना आणि हक्क यांचा आदर करून या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. प्रशासनाचा कणा म्हणून काम करणाऱ्या शासकीय आणि निमशासकीय लिपिक कर्मचाऱ्यांना योग्य सन्मान, वेतन आणि सुरक्षा मिळणे ही केवळ त्यांची मागणी नसून तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या न्याय्य लढ्याला संपूर्ण नैतिक पाठिंबा असून शासनाने लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढावा अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी केली. शांततामय व शिस्तबध्द मार्गाने आंदोलन सुरु आहे. त्यांनी आपली एकजुट कायम ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.
