स्कायवॉक गर्दुल्ल्यांसह भिकार्‍यांच्या कब्जात

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

एकविसाव्या शतकातील नगरी म्हणून नावारूपास आलेल्या नवी मुंबईत नागरिकांच्या सुविधेसाठी सिडको व नवी मुंबई महापालिकेने रस्ता ओलांडण्यासाठी स्कायवॉक उभारले आहेत. मात्र, या स्कायवॉकवर गर्दुल्ले व भिकार्‍यांनी कब्जा केल्याचे चित्र आहे. त्यामुळे करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या सायवॉकचा काहीच उपयोग होत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे.

सिडकोने खारघर रेल्वे स्टेशन ते खारघर उत्सव चौक या दरम्यान कोट्यवधींचा खर्च करून अडीच किमी लांबीचा स्कायवॉक उभारला आहे. मात्र नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने उपयुक्त नसलेल्या या स्कायवॉकचा वापर पादचारी करत नसल्याचे चित्र आहे. रात्रीच्या वेळी गर्दुल्ल्यांसह भिकार्‍यांनी या स्कायवॉकला आश्रयस्थान केले आहे. त्यामुळे जवळपास 200 कोटींहून अधिक खर्च करून उभारलेल्या या स्कायवॉकची गरज होती का, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. अशीच काहीशी परिस्थिती नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही आहे. त्यात ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे, कोपरखैरणे, रबाळे येथील स्कायवॉक, तसेच ऐरोली व पावणे गावातील पादचारी पुलाची हीच अवस्था आहे.

सिडको आणि नवी मुंबई महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी शहरात मोठ्या प्रमाणात स्कायवॉक, पादचारी पूल उभारले असले तरी या स्कायवॉकचा उपयोग नागरिक करताना दिसत नाहीत. उलट अनेक ठिकाणी रस्ता ओलांडून जीव धोक्यात घालत आहेत.

आर.एन. यादव
उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पनवेल

लोकांच्या मागणीनुसार अनेक ठिकाणी स्कायवॉक, पादचारी पूल बांधण्यात आले आहेत. काही स्कायवॉकचा नागरिकांकडून वापर केला जात नाही. त्यामुळे महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

संजय देसाई
शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका
Exit mobile version