आपला पक्ष जगात सर्वात मोठा असल्याचे भाजपवाले सांगतात. नरेंद्र मोदी हे त्यांचेच नव्हे तर विश्वाचे गुरू आणि नेते आहेत. पण नऊ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर या पक्षाचा स्वतःवर भरवसा उरलेला नसावा. कोणत्याही स्थितीत विरोधकांमध्ये ऐक्य होऊ नये या एकाच भावनेने तो सध्या पछाडलेला दिसतो. लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकांना अजून किमान बारा ते सोळा महिने आहेत. त्यासाठी भाजपविरोधी पक्ष एकत्र येऊन आपली आघाडी मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत. एकत्र लढली तर महाराष्ट्रात अशा आघाडीला चांगले यश मिळेल व कदाचित महाराष्ट्राची सत्ताही मिळेल असं अनेक पाहणी अहवालांमध्ये दिसून आलं आहे. या आघाडीमध्ये होता होईल तेवढे खोडे घालण्याचे प्रयत्न होत असतात. सीबीआय, ईडीच्या कारवाया, धमक्या चालू असतातच. महाविकास आघाडीच्या गोटात भांडणे लावून देण्यासाठी मिडियाचा वापर होत असतो. अजित पवार भाजपला जाऊन मिळणार असल्याच्या ज्या बातम्या गेला आठवडाभर सर्वत्र फिरत होत्या त्या अशाच फूटपाड्या मोहिमेचा भाग होत्या. खुद्द शरद पवार आणि अजितदादा यांनी मंगळवारी याबाबत निःसंदिग्ध खुलासा करून त्या फूटपाड्यांना थप्पड लगावली आहे. आपण राष्ट्रवादी व महाविकास आघाडीसोबतच असून जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीचे काम करीत राहू असे अजितदादा यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले. तर विरोधकांचे ऐक्य मजबूत करण्यासाठीच आपले सर्व प्रयत्न राहतील असे शरद पवार यांनीही स्पष्ट केले. यामुळे पुढचा किमान काही काळ तरी संशय निर्माण करणार्या बातम्यांवर पडदा पडेल अशी अपेक्षा आहे. मंगळवारच्या पत्रपरिषदेत अजितदादा म्हणाले त्याप्रमाणे माध्यमांनी आता तरी जनतेच्या खर्या प्रश्नांना वाचा फोडली तर ते हिताचे होईल. अर्थात, भाजप गोटातील कळीचे नारद स्वस्थ बसणार नाहीत. वृत्तवाहिन्या जवळपास त्यांच्या अंकितच आहेत. त्यांच्या मार्फत काही काळाने पुन्हा आपली कुजबूज मोहिम सुरू करतील यात शंका नाही.
संशय का निर्माण झाला?
भाजपच्या या संभ्रम मोहिमेला का यश आले तेही पाहायला हवे. पवार काका-पुतण्यांनी केलेली संदिग्ध वक्तव्ये त्याला जबाबदार होती हे नाकारता येणार नाही. अदानीला क्लिन चिट देऊन शरद पवारांनी याची सुरुवात केली. अदानीच्या कंपन्यांमध्ये वीस हजार कोटी रुपये कोठून आले हा राहुल गांधी यांचा सवाल होता. नरेंद्र मोदींवर त्यांनी थेट आरोप केले. त्यांची उत्तरे देण्याऐवजी राहुल यांची बोलती बंद करण्याचा व खासदारकी रद्द करण्याचा प्रकार झाला. त्या पार्श्वभूमीवर अदानीची पाठराखण करणे म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रकार होता असे याच स्तंभामध्ये आम्ही म्हटले होते. तेथून पवार हे भाजपला अनुकूल भूमिका घेत आहेत का याची चर्चेला प्रारंभ झाला. नंतर पवारांनी त्यावर पडदा टाकला. पण मग अजितदादांनी सर्वांना धक्का दिला. सर्वोच्च न्यायालयाने सोळा आमदारांना अपात्र ठरवले तरीही हे सरकार पडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. खरे तर दादांचे म्हणणे पूर्ण चूक आहे. सोळा आमदारांमध्ये एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. ते जर अपात्र ठरले तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल. आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला की सरकार पडत असते ही बाब विरोधी पक्षनेते असलेल्या दादांना ठाऊक नाही असे कसे म्हणणार? निव्वळ आकडेमोडीच्या आधारे सरकार टिकेल असे त्यांनी म्हणणे हे अनाकलनीय होते. त्यामुळे तेच भाजपला जाऊन मिळतील अशा चर्चेला निमित्त मिळाले. दादांनी खुलासा करून हे तर्कवितर्क लगेच थांबवायला हवे होते. पण पुढचे तीन दिवस वेगवेगळ्या बातम्या येऊनही ते काहीच बोलले नाहीत. उलट मध्यंतरी ते एकदोनदा संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेले किंवा अचानक त्यांनी त्यांचे कार्यक्रमच रद्द केल्याच्या बातम्या आल्या. याबाबतही त्यांनी ताबडतोबीने काही खुलासा केला नाही. त्यामुळे माध्यमांना रान मोकळे मिळाले.
दादांची कसोटी
2004 मध्ये राष्ट्रवादीला अधिक जागा असूनही शरद पवारांनी मुख्यमंत्रिपद काँग्रेसला घेऊ दिले. दादांना मुख्यमंत्री करायचे नसल्याने काकांनी हे केले असे म्हटले जाते. नंतर, पार्थ पवारांच्या लोकसभा उमेदवारीला पवारांचा स्पष्ट विरोध असतानाही दादांच्या हट्टामुळे त्यांना रिंगणात उतरवले गेले आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. मधल्या काळात उपमुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी व प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्यांच्या प्रभावाच्या विरोधात ते असेच नॉट रिचेबल झाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा पहाटेचा शपथविधी हा त्या सर्वांवरचा कळस होता. त्यामुळे अजितदादा हे राष्ट्रवादीतील अस्वस्थ आत्मा आहेत ही बाब लपून राहिलेली नाही. याचा फायदा घेऊन त्यांच्या नावाने असा संभ्रम पसरवणे माध्यमांना सोपे जाते. काका शरद पवार हेदेखील अनेकदा विरोधकांना चकवा देण्याच्या नादात असे निसरडे राजकारण करीत असतात. मात्र अनेकदा ते त्यांच्याच अंगावर उलटते. गेल्या काही दिवसात दादांनीही त्याचा प्रत्यय घेतला आहे. आता इथून पुढे तरी किमान ते अशा संभ्रमांना वाव देणार नाहीत अशी अपेक्षा आहे. महाविकास आघाडी ही नैसर्गिक नाही हे स्वयंस्पष्ट आहे. राममंदिर, सावरकर इत्यादी प्रश्नांबाबतच्या शिवसेनेच्या भूमिका आणि एकूण राजकारणाची पद्धत काँग्रेस-राष्ट्रवादीला पटणारी नाही. परंतु एकेकाळी भाजपचा मित्र असलेला व अजूनही हिंदुत्ववादी असलेला सेनेसारखा पक्ष आज मोदीविरोधात ठामपणे उभा आहे हे महाविकास आघाडीसाठी मोलाचे आहे. मोदीविरोध म्हणजे हिंदूविरोध नव्हे ही बाब त्यामुळे अधोरेखित होत राहते. मंगळवारी पवार काका-पुतण्यांनी जी निवेदने केली त्यावरून त्यांना भाजपला सत्तेतून घालवण्याची मनापासून इच्छा आहे असे वाटते. आता इथून पुढे त्यांनी यावर कायम राहणे आवश्यक आहे. आपल्याबाबतच्या संशयाला वा वावड्यांना थारा मिळणार नाही याची काळजी ते घेतील अशी त्यांच्या सहकार्यांची अपेक्षा असेल. वयाच्या 38व्या वर्षापासून शरद पवारांनी आघाड्यांचे राजकारण यशस्वीपणे केले आहे. इथून पुढे ते करणे ही अजितदादांची कसोटी आहे.