बोर्लीपंचतनमध्ये प्राचीन वृक्षाची कत्तल

| बोर्लीपंचतन | वार्ताहर |

पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासनाकडून वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवला जात आहे. पन्नास वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या झाडांना प्राचीन वृक्षाचा दर्जा दिला आहे. पण अजूनही जनतेच्या मनात वृक्षांबद्दल, पर्यावरणाबद्दल असलेल्या अनास्थेमुळे वृक्षांची बेसुमार कत्तल होत आहे. अशीच एक घटना श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे घडली आहे. इथल्या शंकर मंदीराजवळ असलेल्या तलावाशेजारील एका मोठ्या डेरेदार वृक्षाची तोड करण्यात आली आहे. मनुष्य वस्तीजवळ असलेल्या या वृक्षाची तोड कुणाच्या सांगण्याने व कोणी केली? असा अनेक प्रश्न पर्यावरणप्रेमींना पडला आहे.

दिवसेंदिवस वृक्षसंपदा कमी होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. तापमानात वाढ होऊन पर्जन्यमान घटत आहे. अशातच धोकादायक फांद्यांच्या नावाखाली सरसकट झाडावरच कुऱ्हाड फिरवून नको ते संकट आपण ओढवून घेत आहोत. स्थानिक ग्रामपंचायतीजवळ याबाबत माहीती घेतली असता झाडाशेजारी असणाऱ्या विहीरीमध्ये त्या वृक्षाची पानं पडून पाणी अस्वच्छ होत होते, त्यामुळे त्या पाण्याचा वापर करणाऱ्या तेथील रहिवाशांनी विहीरीवर येणाऱ्या त्या वृक्षाच्या फांद्या तोडण्यासाठी लेखी अर्ज दिला होता. परंतू एवढ्या मोठ्या प्रमाणात या वृक्षाची छाटणी कुणी केली? ते माहीत नाही. त्याबाबत चौकशी करुन माहीती घेण्यात येईल असे सांगण्यात आले. जर झाडाची पानं पडून पाणी अस्वच्छ होत असेल तर या वृक्षाची एवढ्या मोठ्या प्रमाणात तोड न करता विहीरीच्या बाजूला चार खांब मारुन त्यावर कापडाची जाळी टाकली असती तर पालापाचोळा विहीरीत पडण्याचा प्रश्नच नव्हता. परंतू ग्रामपंचायतीने कोणताही निर्णय घेण्याआधीच या वृक्षाची तोड करण्याची घाई कुणाला झाली? तासभर प्राणवायू विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर तोच प्राणवायू फुकट देणाऱ्या आणि आपल्या डोक्यावर सावली धरणाऱ्या, पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या वृक्षाची निर्दयपणे झालेली तोड निसर्गप्रेमींसह अनेक नागरिकांच्या जिवाला चटका लावणारी आहे

Exit mobile version