| अलिबाग | प्रतिनिधी |
गेल कंपनीतील प्रकल्पासाठी लागणारी यंत्रसामग्री आणताना रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे अडथळे ठरत आहेत. ती तोडण्याची मोहिम गेल्या दोन दिवसांपासून कंपनीच्या ठेकेदारांकडून सुरू आहे. फांद्या तोडण्याऐवजी संपूर्ण झाडांची कत्तलच होत आहे. अलिबाग-वावे रस्त्यावरील सावली गायब झाली आहे. पर्यावरण प्रेमींनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
‘झाडे लावा झाडे जगवा’ अभियानामार्फत वृक्षारोपण केले जात आहे. मात्र संवर्धन केलेल्या या झाडांची बेसुमार कत्तल सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. झाडांअभावी पर्यावरणावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. तापमानात दिवसेंदिवस बदल होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाबरोबरच वेगवेगळ्या संस्था, संघटनाच्या मदतीने वृक्षारोपणावर भर देण्यात आला आहे. माळरानांबरोबरच रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड केली जात आहे. लागवड करण्याबरोबरच त्यांचे संवर्धनही वेगवेळ्या संस्था संघटनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. अलिबाग-रोहा मार्गावरील अलिबाग-वावे रस्त्यावरील वेगवेगळया झाडांमुळे नैसर्गिक सौंदर्य फुलू लागले आहे. मात्र उसर येथील गेल कंपनीत नव्या प्रकल्पाच्या कामांसाठी नवनवीन मशनरींची वाहतूक अलिबाग – रोहा मार्गावर केली जात आहे. ही झाडे अडथळा ठरत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेल कंपनीच्या प्रशासनाने झाडांची कत्तल करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीला दुजोरा देत अलिबाग येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्र पाठविले. मात्र या झाडांची कत्तल करण्याचे आदेश देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग अजूनही अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.
अलिबाग-वावे रस्त्यावरील बेलकडेपासून झाडांची कत्तल सुरु केली आहे. झाडांच्या फांद्या तोडणे आवश्यक असताना संपूर्ण झाड कापण्याचे काम ठेकेदार करीत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील झाडांची बेसुमार झालेल्या कत्तलीमुळे सावली गायब झाली आहे. मनमानी कारभारामुळे रस्त्याच्या दुर्तफा असलेली झाडे आता लवकरच कालबाह्य होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल कंपनीच्या वाहनांसाठी झाडे अडथळे ठरत आहेत. त्यामुळे त्यांनी झाडांच्या फांद्या तोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार वनविभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्याची माहिती नाही.
राजेंद्र डोंगरे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग
बांधकाम विभागाच्या मागणीनुसार फांद्या तोडण्याची मान्यता दिली आहे. फांद्याव्यतिरिक्त झाडांची कत्तल झालेली आढळून आल्यास संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल.
नरेंद्र पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, अलिबाग
अलिबाग-रोहा रस्त्यालगतची झाडे आहेत. स्थानिकांनी जपली आहेत. केवळ गेल कंपनीची वाहने जाण्यासाठी झाडांची कत्तल होणे म्हणजे एक प्रकारे पर्यावरणावर अन्याय आहे. कंपनीचे पर्यावरणाबाबत योगदान काय आहे, त्यामुळे कंपनीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची लागवड करणे गरजेचे आहे. कंपनीला सवलत देणे चुकीचे आहे. ज्यांनी झाडे तोडली आणि ज्यांनी परवानगी दिली त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
ॲड. राकेश पाटील, पर्यावरण प्रेमी