। नवीन पनवेल । वार्ताहर ।
पनवेल-शीव महामार्गावर कामोठे बस स्थानक परिसरात 100 पेक्षा जास्त तिवरांच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत पनवेल तहसील कार्यालयाने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यात अवैधरित्या माती व रेती उत्खननाच्या घटना वारंवार घडत आहेत. तहसील कार्यालयाच्या कारवाईला न जुमानता राजरोसपणे हे अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असताना पनवेल-शीव महामार्गावर कामोठे बस स्थानकाजवळ हनुमान मंदिराजवळ 100 ते 110 तिवरांच्या झाडांची कत्तल केल्याची घटना उजेडात आली आहे. वन विभागाच्या माहितीवरून घटनास्थळावर 120 मीटर लांब 1 मीटर रुंद व 1.5 मीटर उंचीचा बांध खाडीपात्रात घालण्यात आला असून सर्व्हे क्रमांक 56 व 368 मधील जवळपास 100 ते 110 कांदळवने तोडली आहेत.
अवैध बांधकामासाठी तिवरांची झाडे नष्ट केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पनवेल तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी संतोष कचरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
स्मिता जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कामोठे
उच्च न्यायालय, राज्य सरकार, कांदळवन समितीने सिडकोला कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले आहेत. सिडकोने अद्याप कार्यवाही पूर्ण केली नाही. खारघर विभागात सुमारे 180 हेक्टर कांदळवन क्षेत्र असून फक्त 18 हेक्टर क्षेत्र हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
बी. एन. कुमार, पर्यावरणप्रेमी, नवी मुंबई