। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महापालिका क्षेत्रात रस्ते, गटारे, पथदिवे, मलनिःसारण वाहिन्या या सेवा हस्तांतरणाच्या प्रक्रियेत अंतिम टप्प्यामध्ये आहेत. काही सेवांचा महापालिकेने आगाऊ ताबा घेतला आहे; परंतु पाणीपुरवठ्याबाबत मात्र मनपा प्रशासन अनुत्सुक असल्याचे चित्र असल्याने पुढील काळातही पनवेल महापालिका हद्दीतील वसाहतींना पाणीपुरवठा करण्याची कसरत सिडकोलाच करावी लागणार आहे.
महापालिका क्षेत्र, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे, तळोजा आणि नावडे हे नोड समाविष्ट करण्यात आले आहेत. खारघरला हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र मागणी आणि पुरवठ्यामध्ये कमालीची तफावत असल्याने आरक्षित पाणी असतानाही खारघरची तहान भागत नाही. कामोठे कॉलनीला नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरण पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. वसाहतीला बेचाळीस एमएलडी पाण्याची गरज आहे; परंतु प्रत्यक्षात 35,36 एमएलडीपर्यंतच पाणी मिळते. त्यामुळे भर पावसाळ्यातही कामोठे येथील इमारतींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. हीच परिस्थिती कळंबोली, नवीन पनवेल आणि खांदा वसाहतींची असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी घेऊन सिडकोला पाणीपुरवठा करावा लागत आहे.
साठवणूक टाक्यांचा अभाव
सिडको वसाहतींमध्ये पूर्वी उंचावरील जलकुंभ होते. ते जमीनदोस्त करण्यात आले आहेत. अशातच आणीबाणीच्या काळामध्ये पाणी साठवून ठेवण्यासाठी सिडकोकडे कोणतीच यंत्रणा नसल्यामुळे पाणीपुरवठा करणे कठीण होते.