निवडणुकीचे ढिसाळ नियोजन

अमर वार्डे यांची मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडे तक्रार

। रायगड । प्रतिनिधी ।

लोकसभा निवडणुकीच्या कालावधीतील रायगड जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा पाढा दत्ताजीराव खानविलकर शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष अमर वार्डे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे वाचला आहे. जिल्हा निवडणूक विभागाने केलेल्या नियोजनाचा कर्मचार्‍यावर ठेवलेला धाक वार्डे यांनी मुख्य निवडणूक अधिकार्‍यांना पत्राद्वारे अनुभव कथन केला आहे. शासकीय पातळीवर पाठविलेल्या कोणत्याही पत्राची दखल न घेण्याची प्रथा अस्तित्वात आहे. त्यामुळे पात्राला केराची टोपली दाखवलं हि बाब वार्डे यांनी पत्रामध्ये अधोरेखित केली आहे.

मे 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी दत्ताजीराव खानविलकर शैक्षणिक संस्थेच्या शाळेतील शिक्षक व शिक्षिका निवडणूक कामासाठी नेमले गेले होते. त्यांच्या अनुभवावर आधारित पत्रप्रपंच करून वार्डे यांनी निवडणूक विभागाच्या नियोजनावर आक्षेप घेतला आहे. रोहा-खुटल येथे निवडणुकीसाठी नेमणूक झालेल्या अधिकार्‍यांची जेवणाची व्यवस्था नव्हती. त्यामुळे स्वखर्चाने जेवण मागवावे लागले. निवडणुकीचे काम करण्यासाठी निवडण्यात आलेल्या स्त्री शिक्षिकेची नेमणूक तालुक्यातच करण्यात यावी. अनेक शिक्षकांना दुसर्‍या तालुक्यात नेमणूक मिळाली होती. श्रीवर्धन मतदारसंघात नियुक्ती करण्यात आलेल्या अनेक मतदान बूथवर स्वच्छतागृहात वापरण्यात येणारे पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिले होते. अलिबाग मतदार संघातून जाताना वाहतूक व्यवस्था व्यवस्थित होती. परंतु, श्रीवर्धन आणि महाड मतदार संघातून परतीचा प्रवास अतिशय त्रासदायक झाला, वाहतूक व्यवस्था योग्य प्रकार उपलब्ध नव्हती, असे अमर वार्डे यांनी पत्रात नमूद केले आहे.

अलिबाग शहरात जे.एस.एम. कॉलेजच्या आवारात निवडणूक व्यवस्थेचे प्रमुख केंद्र होते. ऐन उन्हाळ्यातदेखील तिथे किमान पंख्याचीही सोय नव्हती. राखीव कर्मचान्यांना दुपार होईपर्यंत कोणतीही सुविधा दिली गेली नाही. इतकेच नव्हे तर तेथे उपस्थित महिलांनी अव्यवस्थेविरोधात आवाज उठविल्यावर त्यांना घरी जाण्यास सांगितले. निवडणुकीनंतर दोन आठवड्यांनी त्यांना निवडणूक कामाचा मोबदला दिला गेला. अनेक महिला कर्मचार्‍यानी सांगितल्यानुसार तहसिलदारांनी अनेक महिला कर्मचार्‍यांशी उद्धटपणाने वर्तन केले. इतकेच नव्हे तर अपमानास्पद वागणूक दिली, असे वार्डे यांनी मुख्य निवडणूक अधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

अलिबाग शहरात निवडणूक कामाच्या प्रशिक्षणासाठी मेघा चित्रमंदिर आणि आरसीएफच्या निवासी संकुलाच्या हॉलचा वापर केला गेला. या दोनही ठिकाणी घामाघूम होऊन प्रशिक्षणाचा जाच सहन करावा लागला. इतकेच नव्हे तर प्रश्‍न विचारणार्‍यांना निवडणूक विषय कायद्याची धमकी देऊन गप्प बसविण्यात आले. आरसीएफचा हॉल वातानुकूलीत असतानाही त्या यंत्रणेचा वापर केला गेला नाही. दोन्ही ठिकाणी जेवणाची व्यवस्था अत्यंत असमाधानकारक होती. परिणामी बाहेर जाऊन जेवणाचा मार्ग पत्करला गेला. त्यासाठी स्वतःच्या खिशातूनच पैसे खर्च करावे लागले.
Exit mobile version