डीकेईटीची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ऑनलाईन शाळा चालविण्यात अडचणी येत असल्यामुळे आम्हाला आमच्या जबाबदारीवर पहिली ते चौथीची शाळा ऑफलाईन सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशनल ट्रस्टचे (डीकेईटी) अध्यक्ष अमर वार्डे यांनी रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
शासनाचे सर्व नियम पाळून चिंतामणराव केळकर विद्यालयाने सप्टेंबर महिन्यात पाचवी ते दहावीची ऑफलाईन शाळा सुरु केली आहे. आतापर्यंत एकाही विद्यार्थ्याला कोरोना झाला नाही. 16 नोव्हेंबरपासून पहिली ते चौथीची शाळा सुरू करावी, अशी इच्छा आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केली आहे.
आम्हाला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मान्य नाही. ऑनलाईन शिक्षण देताना अनेक अडचणी निर्माण होतात. ज्या दूर करणे आमच्या हातात नाही. यावर एकच उपाय म्हणजे पहिली ते चौथी शाळा ऑफलाईन सुरू करणे. आमच्या अडचणींचा विचार करुन पहिली ते चौथी ऑफलाईन शाळा सुरू करण्यास आम्हाला परवानगी देण्यात यावी, असे जिल्हाधिकार्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
शाळा सुरु करताना व्यवस्थापनातर्फे विद्यार्थ्यांची पूर्ण काळजी घेतली जाईल. जर जिल्हा प्रशासनाने आम्हाला शाळा सुरु करण्यास परवानगी दिली नाही तर आम्हाला पालकांचा आग्रह लक्षात घेऊन आमच्या जबाबदारीवर शाळा सुरु करावी लागेल. तशी तयारी आम्ही केली आहे.
अमर वार्डे, अध्यक्ष, डीकेईटी