संथ कामाचा मुरुडकरांना फटका

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग-मुरुड मार्गावरील बोर्ली नाका येथे काँक्रीट रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. काँक्रीटीकरणाचे काम संथ गतीने असल्याने त्याचा फटका प्रवाशांसह बोर्लीसह मुरुडमधील नागरिकांना बसला आहे. ऐन गणेशोत्सवात या मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्याचा चित्र पहावयास मिळाले आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप होत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने हा आरोप फेटाळला आहे.

बोर्ली नाका येथे पावसात खड्डे पडत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने बोर्ली नाक्यापासून 140 मीटर अंतरापर्यंत काँक्रीट रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. कामाला मंजूरी मिळून अनेक महिने उलटून गेली. मात्र ठेकेदार तांबडकर यांनी कामाला वेळेवर सुरुवात न केल्याचा फटका प्रवाशांना बसला. पावसाळा सुरु झाल्यावर गेल्या पंधरा दिवसापुर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले. रस्त्याची एक बाजू काँक्रीटीकरण केले. मात्र गणेशोत्सवापुर्वी काम पुर्ण होणे अपेक्षीत असताना संथगतीने केलेल्या कामामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. मात्र याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली, असता, निकृष्ट दर्जाचे काम नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

140 मीटरच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण असून एका बाजूचे काम पुर्ण झाले आहे. दुसऱ्या बाजूचे काम लवकरच सुरु होणार आहे. एक वर्षाच्या आत काम पुर्ण करणे गरजेचे आहे.

रमेश गोरे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुरुड
Exit mobile version