ऑनलाईन सुविधेअभावी नागरिक त्रस्त
| पनवेल | प्रतिनिधी |
डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटीच्या घोषणा होत असताना, नवी पनवेलमधील सिडको कार्यालयाचा कारभार मात्र अजूनही पारंपरिक पद्धतीवरच सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. सेक्टर 1 येथील कार्यालयात पाणी बिल भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना प्रत्यक्ष रांगेत उभे राहून बिल भरावे लागत आहे.
यामुळे भरउन्हात नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, नोकरदार, महिला आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. सोमवारी सकाळी अशाच रांगेत उभ्या असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला उकाड्यामुळे चक्कर आल्याची घटना घडली. उपस्थितांनी तत्काळ मदत केल्याने पुढील अनर्थ टळला. कार्यालयाबाहेर सावली किंवा शेडची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागत आहे. तसेच बिलांमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी वारंवार कार्यालयात जावे लागत असल्याची तक्रारही नागरिकांनी व्यक्त केली. नवी मुंबईसारख्या नियोजित शहरातही ऑनलाईन बिल भरण्याची सुविधा उपलब्ध नसणे ही खेदजनक बाब असल्याचे नागरिकांचे मत आहे. आम्ही कर वेळेवर भरतो, मग साध्या बिलासाठी रांगेत का उभे राहावे? असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. सिडको प्रशासनाने तातडीने ऑनलाईन पेमेंट सुविधा सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे.
