स्मार्ट मीटरमुळे वाचक कंपन्यांवर आर्थिक संकट

मीटर वाचनासह वितरण कामाबाबत निर्णय घेण्याची मागणी

| रायगड | प्रतिनिधी |

महावितरणच्या विविध विभागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मीटर वाचन, बिल प्रिंटिंग व वितरणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या मीटर रिडिंग एजन्सी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या अडचणींचा मुद्दा उचलून धरीत राज्य शासन व महावितरणकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

स्मार्ट मीटर बसविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने पारंपरिक पद्धतीने मीटर वाचन करणाऱ्या एजन्सींचे काम मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. परिणामी, या एजन्सींना कर्मचारीवर्गाला नियमित वेतन देणे अवघड झाले असून, त्यांच्या उपजीविकेवर गदा येत आहे.

असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट मीटर बसविणारी कंत्राटी यंत्रणा अनेक ठिकाणी अर्धवट काम करून निघून जाते. त्यामुळे काही भागात अंशतः स्मार्ट मीटर बसवले गेले असून, ग्राहक शोधणे व वाचन करणे अत्यंत कठीण ठरत आहे. यामुळे एजन्सींना दुहेरी आर्थिक फटका बसत आहे. याबाबतचे निवेदन अलिबाग येथील महावितरण कार्यालयात नुकतेच सादर करण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत कामकाज सुरळीत ठेवणे अवघड झाल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले. खर्चात झालेली वाढ व रिडिंग कामातील घट लक्षात घेता, सध्याचे दर अत्यंत अपुरे व तोट्याचे ठरत असल्याचा असोसिएशनचा दावा आहे. यापूर्वीच दरवाढीचा प्रस्ताव सादर करूनही तो अद्याप निर्णयाविना प्रलंबित असल्याने असंतोष वाढत आहे.

असोसिएशनने मांडलेल्या मागण्या
करार संपेपर्यंत संबंधित ग्राहक पूर्ववत ठेवावेत. शंभर टक्के स्मार्ट मीटर बसवून पूर्ण होईपर्यंत त्या क्लस्टरमधील पूर्ववत ग्राहक संख्येप्रमाणेच रक्कम एजन्सींना अदा करावी. दरवाढीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा. जर शासन व महावितरण प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर राज्यभरातील सर्व मीटर रिडिंग एजन्सी कामबंद आंदोलन छेडतील, असा इशारा असोसिएशनने दिला आहे.या पार्श्वभूमीवर महावितरण प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Exit mobile version