स्मार्टफोन वापरणार्‍यांनो, खात्यातील पैसे सांभाळा

ऑनलाइन फसवणुकीचा वाढता धोका; सायबर गुन्हेगार झाले सक्रिय

पनवेल । वार्ताहर ।

स्मार्टफोनच्या वापरकर्त्यामध्ये त्याच्या योग्य वापराबद्दल असलेल्या अज्ञानाचा फायदा सायबर गुन्हेगारांकडून घेतला जात आहे. अशातच मागील दीड वर्षात सायबर गुन्हेगार अधिकच सक्रिय झाल्याचे गुन्हेगारी कारवायांवरून समोर येत आहे. त्यात अनेकांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतल्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत.

कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊन पासून मागील दीड वर्षात स्मार्टफोन व त्यामधील अ‍ॅप्लिकेशन वापरत असताना अनेकांना त्याच्या धोक्याची देखील कल्पना नसते. परिणामी कोणत्याही अनोळखी अ‍ॅपवर स्वतःची व बँकेची माहिती भरली जात आहे. अथवा कोणताही बारकोड स्कॅन करणे, फसव्या जाहिरातींना भुलून प्रतिसाद देणे असे प्रकार सुरूच आहेत.

अशा प्रकारांमधून सायबर गुन्हेगार हे त्यांना हवी असलेली माहिती साठवत असतात. त्यानंतर एखाद्या महिलेमार्फत बँकेतून बोलत असल्याचे सांगून फोनवरूनच तुम्हाला कार्ड बंद होण्याची अथवा केवायसीच्या बहाण्याने ओटीपी मागितला जातो. त्यानंतर काही क्षणातच तुमच्या बँक खात्यातील रक्कम हडपली जाते. अशा प्रकारे व इतर अनेक प्रकारे गंडा घातल्याच्या घटना शहरात अनेक ठिकाणी घडल्या आहेत.

इंस्टाग्रामचा वाढता वापर

मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांकडून इंस्टाग्रामचा देखील वापर वाढला आहे. त्यातही अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. अशा गुन्ह्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासंदर्भात पोलिसांकडून अनेकदा खबरदारीच्या सूचना केल्या जातात. त्यानंतरही अनेकजण सोशल मिडीयावरील अमिषांना बळी पडून सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत असतात.

Exit mobile version