प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात खासगी कंपन्यांद्वारे चालवल्या जाणार्या बसेसच्या देखभाल व दुरुस्तीअभावी श्रीवर्धन तालुक्यातील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. बोरीवली-श्रीवर्धन या रातराणी बसचे नेरुळ येथे क्लच प्लेट गेल्याने चालकाचा केबिनमधून अचानक धूर येऊ लागला. त्यामुळे प्रवाशांना भररस्त्यात दोन तास पर्यायी बसची वाट बघत उभे राहावे लागले.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी, (दि.17) रोजी रात्री दहा वाजता श्रीवर्धन आगाराची बोरीवली साई बोर्लीपंचतन श्रीवर्धन ही खासगी बस जवळपास पस्तीस प्रवासी घेत श्रीवर्धनकडे मार्गस्थ होत असताना मध्यरात्री 12.45 दरम्यान नेरुळ येथे क्लच प्लेट गेल्याने चालकाच्या केबीनमधून धूर येऊ लागला व बस बंद पडली. वाहकाने श्रीवर्धन आगार प्रमुखांशी संपर्क केल्यानंतर साधारण मध्यरात्री तीन वाजता पनवेल आगाराची बस नेरूळ येथे प्रवाशांसाठी पाठवण्यात आली.
प्रवाशांनी केलेल्या तक्रारीनुसार वाहक हा श्रीवर्धन आगाराचा तर चालक व बस ही खासगी कंपनीची असल्याने पर्यायी बसची व्यवस्था कोणी करायची याबाबतीत चालक व वाहकाची अनेक वेळ वादावादी सुरू होती. यावेळी प्रवाशांनाही चालक, वाहकाकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. श्रीवर्धन तालुक्यातील मेंदडी येथे काही दिवसांपूर्वी श्रीवर्धन आगाराच्या बसमधील स्टार्टर निकामी झाल्याने चालकाच्या केबिनमध्ये धुराचे लोट निघाल्याने प्रवासीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याचीच पुनरावृत्ती नेरूळ येथे प्रवाशांना बघायला मिळाली.