गॅस दरवाढीने ‘उज्ज्वला’च्या डोळ्यात धूर

महिलांचे सरकारपुढे गॅस दरवाढ नियंत्रणाचे साकडे
| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |

महागाईने सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले आहे. कोरोनाच्या महामारीनंतर सर्वांचे जनजीवन विस्कळीत झालेय. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. एकवेळच्या जेवणाची पंचाईत तिथं हजार रुपयांच्या वर वाढलेले गॅस सिलिंडरचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. सरकारी योजना गरिबांच्या मुळावर उठल्या आहेत. दिवसेंदिवस होणार्‍या गॅस दरवाढीमुळे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना उज्ज्वलाच्या लाभार्थ्यांच्या डोळ्यात धूर व हाती फुंकणी आली आहे.

ग्रामीण व शहरी भागातदेखील आता चुली पेटल्या आहेत. उज्ज्वला योजनेचे तीनतेरा वाजलेत. या योजनेतील लाभार्थ्यांना इतके पैसे भरुन सिलिंडर आणणे आवाक्याबाहेर गेले आहे. ग्रामीण भागातील अनेकांनी तर पुन्हा चुलीवर जेवण बनविण्यास प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे केंद्राचे चूल आणि धूरमुक्तीचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार का? असा सवाल उपस्थित होतोय. केंद्र शासनाने चुलीवर जेवण बनविणार्‍या गोरगरीब महिलांना चुलीच्या पुरापासून व फाट्यापासून मुक्ती देण्याकरता महत्त्वाकांक्षी योजना उज्ज्वला योजना 2016 मध्ये लागू केली. या योजनेंतर्गत केंद्र सरकारने गोरगरिबांना मोफत गॅस कनेक्शन दिले. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ चुलीच्या धुराचा सामना करणार्‍या गरीब परिवारातील महिलांना थोडा आधार मिळाला खरा; पण त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. कारण, गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने दरवाढ होत असल्याने सरकारच्या उज्ज्वला योजनेला हरताळ फासला गेला आहे.

ज्योती पवार या महिलेने सांगितले की, आम्ही ब्लॉकमध्ये भाड्याने राहतो, त्यात गॅस दरवाढ होत असल्याने चुलीचा पर्याय आम्ही वापरू शकत नाही, चूल पेटवली तर रूम सोडावी लागेल, पण इतरत्र गेलो तरी चूल पेटवायला लाकडे कुठून आणणार? वृक्षतोडीवर बंदी आहे. मग कारवाईला कोण सामोरे जाईल. कोरोनाकाळात मालकांच्या हाताला काम नव्हते, त्यामुळे उसनवारी घेऊन दिवस काढले, आज बारा-बारा तास काम करतो, त्यावेळेस पगार हातात पडतो, पण महागाईने या पगारात मुलंबाळ कशी सांभाळायची, दिवस कसे काढायचे, याची सतत चिंता सतावते. मायबाप सरकारने गोरगरीब जनतेचा विचार करावा, गॅसचे दर कमी करून सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा असे सांगितले.
पावसाळ्यात रानात जाणे शक्य नाही, तर ओली लाकडे पेटत नाहीत. प्लास्टिक वर बंदी आहे तर रेशनवर घासलेट मिळत नाही, चहूबाजुनी आमची कोंडी सरकारने केलीय असा संताप सुमन अडसुळे यांनी व्यक्त केला.

कोरोनाच्या महामारीनंतर पैसे आणणार कुठून, महागाईने बेजार झालोय, चूल पेटवायची तर लाकड आणावी लागतात, जंगलात जावे लागते, पावसात जाणे शक्य नाही, रॉकेलदेखील मिळत नाही, चूल पेटवावी तरी कशी हा विचार पडतो, असे जांभुळपाड्यातील कल्पना पवार यांनी सांगितले. वैशाली खराडे या महिलेने संतप्तपणे म्हटले की पेट्रोल, डिझेलचे भाव झपाट्याने वाढत आहेत, याबरोबर गॅस सिलिंडरचे भावदेखील खूप वाढत आहेत. वर्षाला गॅसचे भाव जर 400 व 500 रुपयाने वाढले तर माणसाने संसार कसा करायचा, माझे पती निवृत्त झालेले आहेत, अशात वाढत्या महागाईचा सामना आम्ही कसा करायचा? सरकार महागाई भरमसाठ वाढवते, त्या मानाने पगार वाढत नाहीत, मग गोरगरिबांनी जगायचे की मरायचे, याचा विचार सरकारने केला पाहिजे. आजकाल सर्वच गोष्टी महागल्या आहेत. सर्वांची परिस्थिती सारखी नाही. आता गाड्या दारात लावून एसटीने कामावर जायची वेळ सरकारने लोकांवर आणलीय. घर संसार घरातील महिलांना चालवावे लागते, महागाईने नाकी नऊ येतोय असे खराडे म्हणाल्या.

लाकूडफाटा मिळत नाही त्यामुळे मोठं आव्हान उभे ठाकलेय. महाग गॅस सिलिंडर विकत घेण्याची ऐपत नसलेल्या गोरगरीब परिवारातील महिलांना लाकूड वा कोळशाच्या चुलीवर स्वयंपाक करून धुराचा सामना करावा लागत आहे. कोरोना महामारीत रोजगार बुडाला, जगण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले, त्यात महागाईने जीव व्याकुळ झाल्याचे मत महिलांनी मांडले. राज्यातील अनेक गरीब उज्ज्वलांवर चूल फुंकण्याची वेळ आणली आहे. सिलिंडरच्या वाढलेल्या किमतीमुळे गोरगरीब महिलांना फुंकणी हातात धरून अश्रू गाळण्याची वेळ आली आहे. सरकारने गॅस सिलिंडरचे भाव कमी करावेत, अशी मागणी महिलांनी केली आहे.

गॅसचे भाव वाढल्याने घर चालवावे कसे हा प्रश्‍न पडला. ग्रामीण भागातील महिलांना लाकूडफाटा जमा करायला रानावनात भटकावे लागतेय. धुराचा त्रास होतो, जीव मेटाकुटीला येतोय, चुलीवर जेवण बनवणे कठीण जातेय, सर्वच वस्तूंची महागाई वाढले, जगावे की मरावे अशी परिस्थिती आहे.

छायाबाई सावंत, बेणसे सिद्धार्थ नगर

सिलिंडर गॅसचे भाव वाढल्याने घरोघरी चुली पेटल्या आहेत. महिलांनी आता त्रास सहन करून चुलीवर जेवण बनवायला सुरवात केलीय. मात्र, वृद्ध महिलांची चुलीवर जेवण बनविण्याच्या प्रक्रियेत मोठी दमछाक होतेय. गॅस आणायचा म्हणजे 1050 रुपये लागतात, आमची परिस्थिती हलाखीची अशात पैसे आणायचे कुठून? म्हातारपण यामुळे लाकडे आणता येत नाहीत, काम होत नाही, खूप अडचणी आहेत, सरकारने गरिबाला जगवावे, ही विनंती.

चंद्रभागा अडसुळे
Exit mobile version