सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
| अलिबाग | प्रतिनिधी |
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले. महाड येथील शासकीय विश्रामगृहात महामार्गाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवार, दि. 3 सप्टेंबर रोजी बैठक झाली.
नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. वाहतुकीचे नियमित निरीक्षण करून दैनंदिन अहवाल सादर करावा, असे निर्देश भोसले यांनी दिले. तसेच माणगाव व इंदापूर बायपासची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गणेशोत्सव काळात महामार्गावर सुविधा केंद्रे उभारून स्वच्छता, वीज, पाणी, वैद्यकीय सुविधा आणि चलत स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत. वाहतुकीचा भार वाढल्यास पर्यायी मार्गांचा वापर करता यावा, यासाठी अंतर्गत रस्ते सुस्थितीत ठेवावेत, असेही भोसले यांनी सांगितले. महामार्गावरील टोलमाफीसाठी दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी थेट संपर्क साधण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
बैठकीस पालकमंत्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपस्थित होत्या. तसेच शरद राजभोज, सचिव (रस्ते), श्री. शेलार, सचिव (राष्ट्रीय महामार्ग), राजाराम गोसावी, मुख्य अभियंता, कोकण विभाग, विवेक बडे, अधीक्षक अभियंता, रायगड, मिलिंद कुलकर्णी, अधीक्षक अभियंता, रत्नागिरी, डॉ. रूपाली सातपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
