खासगी गाडीला लाल दिवा; नकली गणवेश अन् दारूची तस्करी

सेवानिवृत्त लष्करी जवानासह तोतया पोलीस ताब्यात

। कोल्हापूर । प्रतिनिधी ।

अधिकार्‍याची मोटार असल्याचे भासवून चक्क लाल दिव्याच्या वाहनातून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करण्याचा प्रकार समोर आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने महागाव येथे कारवाई करत तोतया अबकारी पोलिस नितीन दिलीप ढेरे (वय 33, रा. जाधववाडी, मार्केटयार्ड) व सेवानिवृत्त लष्करी जवान शिवाजी आनंदा धायगुडे (57, रा. अंदोरी, खंडाळा, सातारा) यांना अटक केली. तसेच, त्यांच्याकडून दोन मोटारींसह अडीच लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे.

नेसरी-गडहिंग्लज रस्त्यावरील महागाव ओढ्यानजीक मोटारीतून गोवा बनावटीची दारू आणून दुसर्‍या वाहनात भरले जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक स्नेहलता नरवणे यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने जिल्हा भरारी पथकाला त्याठिकाणी पाठवले असता मध्यरात्री तीनच्या सुमारास ओढ्यानजीक लाल दिवा लावलेल्या वाहनातून हा मद्यसाठा दुसर्‍या वाहनात भरला जात असल्याचे दिसून आले.

यावेळी संशयित नितीन ढेरे अबकारी पोलिसांच्या गणवेशातच सापडला. दुसर्‍या मोटारीतील संशयिताचे नाव विचारले असता त्यानेही लष्करातून सेवानिवृत्त झालो असल्याचे सांगितले. महागाव ओढ्याजवळ ढेरे याने आणलेले मद्य संशयित धायगुडे याच्या मोटारीत भरण्याचे काम सुरू होते. यावेळी ढेरे याने मोटारीचा लाल दिवा सुरूच ठेवला होता. पथक घटनास्थळी आल्यानंतर खाकी गणवेश, नेमप्लेट, बेल्ट व शिक्क्यासह ढेरे याला पाहून भरारी पथकालाही धक्का बसला. त्यांनी दोघा संशयितांना ताब्यात घेत सर्व साहित्यही जप्त केले.

Exit mobile version