पोलिसांसह होमगार्डच्या सर्तकतेमुळे चार कोटींचा ऐवज जप्त
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
व्हेल या संरक्षित वन्यजीव प्राण्याच्या उलटीची तस्करी करणाऱ्याला चाळमळा येथून अटक करण्यात आली आहे. अलिबाग पोलीस आणि होमगार्ड जवानांच्या सर्तकतेमुळेच 4 कोटी 25 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आमदारांच्या गावातच अवैध धंद्यांना ऊत आल्याने चर्चेला उधाण आले आहे. ही घटना सोमवारी (दि.27) पहाटेच्या सुमारास चाळमळा येथील जेट्टीजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या आदेशानुसार, सागरी किनाऱ्यावरील संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांसह होमगार्ड तैनात केले जात आहेत. अलिबागचे पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि.26) सायंकाळपासून ते सोमवारी (दि.27) सकाळपर्यंत पोलिसांसह होमगार्डमार्फत थळ येथील चाळमळा जेट्टीवर गस्त ठेवण्यात आली होती.
दरम्यान, अलिबागचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील, पोलीस हवालदार अजित देशमुख, नितेश वरसोलकर, होमगार्ड जवान अनिल राठोड, करण नागावकर, जगदीश पवार, भालचंद्र पाटील हे बंदोबस्त करीत असताना सोमवारी (दि.27) मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास एक तरुण दुचाकी घेऊन चाळमळा जेट्टीवर फिरत होता. त्याची हालचाल संशयित वाटल्यानंतर पोलिसांनी गाडी थांबवून त्याची विचारपूस केली. गाडीतील डिकी तपासली असता, व्हेल या संरक्षित जातीच्या वन्य जीवाची उल्टी एका पिशवीत दिसून आली. राहुल हातणी असे या तरूणाचे नाव असून, तो थळमधील चाळमळा येथील रहिवासी आहे.
दरम्यान, उल्टी बाळगणे, वाहतूक करणे व त्याची विक्री करणे असा ठपका ठेवत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग पोलिसांनी राहुल हातणी याच्यासह चार कोटी रुपये किमतीची चार किलो वजनाची व्हेलची उलटी व 25 हजार रुपयांची दुचाकी असा एकूण 4 कोटी 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
