सापांना मिळतोय जगण्याचा हक्क

गैरसमज व भीती दूर; सर्पमित्रांचे उल्लेखनीय कार्य

। पाली /बेणसे । वार्ताहर ।

साप म्हटले की अनेक जणांची पाचावर बसते. सजीवसृष्टीतील महत्वाचा घटक असलेल्या सापांबद्दल अनेक समज गैरसमज व भीती असल्याने साप दिसला की त्याला मारण्यासाठी काठी शोधली जाते. मात्र गेल्या काही वर्षात सर्पमित्रांचे उल्लेखनीय काम व वन्यजीव रक्षक संस्था आणि वनविभाग यांच्या द्वारे करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे लोकांचा सापाला मारण्यापेक्षा वाचवण्याकडे कल वाढला आहे.

गाव खेड्यांचा आदिवासी वाड्यापाड्यांमध्येही हा अनुकूल बदल दिसून येत आहे. विशेष म्हणजे सापांना त्यांच्या अधिवासात मोकळेपणाने जगण्यासाठी खुले आंदण मिळत आहे. जिल्ह्यातील सह्याद्रीच्या विस्तीर्ण पर्वतरांगा 240 किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा, विपुल वनसंपदा सापांसाठी मुबलक खाद्य, पोषक हवामान व चांगला अधिवास यामुळे रायगड जिल्ह्यात विविध जातीचे साप आढळतात. वाढते नागरीकरण, कारखानदारी, वनतोड व अतिवृष्टीमुळे सापांचे मानवी वस्तीमध्ये येण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वर्षांपूर्वी मानवी वस्तीत किंवा परिसरात साप आल्यास त्याला सर्रास मारले जायचे, शिवाय त्याच्याबद्दल अनेक अंधश्रद्धा व गैरसमज होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. जिल्ह्यात साधारण 150 ते 250 सर्पमित्र, विविध वन्यजीव संरक्षक संघटना संस्था व वन विभागाची प्रभावी जनजागृती व प्रबोधनामुळे असंख्य सापांचे जीव वाचत आहेत.

सापांचा अधिवास सुरक्षित राहायला हवा. लोक सापांविषयी बोलतात, साप आल्यास त्याला पकडण्यासाठी सर्पमित्राला बोलावतात. तसेच ते स्वतःहून सापाला वाचवण्यासाठी पुढे यायला हवेत. सर्पमित्र कोणताही मोबदला न घेता जीवावर उदार होऊन सापांचे प्राण वाचवतात मात्र या सर्पमित्रांना वनविभाग तसेच शासनाकडून किमान विम्याचे कवच तरी देण्यात यावे.

तुषार केळकर,
सर्पमित्र,
सुधागड

साप या आधी सुद्धा मानवी वस्तीत येत होते. मात्र ते बरेचदा मारले जायचे आताही साप मानवी वस्तीत येतात पण वन विभाग व सर्पमित्र यांच्या प्रयत्नाने त्यांना व्यवस्थित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले जाते, तसेच या संदर्भात विविध संस्था संघटना आणि वन विभागाच्या माध्यमातून प्रबोधन व जनजागृती करण्यात येत आहे. सर्व मित्रांच्या कार्याचे वनविभागातर्फे कौतुक केले जाते.

समीर शिंदे,
वनपरिक्षेत्र अधिकारी कांदळवन,
अलिबाग
Exit mobile version