। रायगड । प्रतिनिधी ।
अलिबागमधील जिल्हा रुग्णालयातील धोबी घाट रुममध्ये सापाचा वावर असल्याचे समोर आले आहे. शनिवारी (दि.८) सकाळी या रुमध्ये साप आढळून आल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील चादर, बेडसीट व उशी कव्हर, रुग्णांचे गणवेश इत्यादी कपडे रुग्णांना वापरण्यासाठी दिले जातात. हे कपडे स्वच्छ ठेवण्यासाठी रुग्णालयाच्या आवारात स्वतंत्र धोबी घाट रुम आहे. या रुममध्ये कपडे धुतल्यानंतर ते सुकवून घडी घालून पुन्हा रुग्णांना वापरण्यासाठी दिले जातात. मात्र, याच धोबी घाटमधील रुमध्ये सापाचा वावर असल्याची भीती निर्माण झाली आहे. या रुममध्ये कपडे अस्ताव्यस्त टाकलेले असतात. हा परिसर स्वच्छ ठेवला जात नसल्याने साप व इतर दंश करणारे प्राणी या रुममध्ये घुसत आहेत. त्यामुळे त्यांचा वावर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी या रुमध्ये एक भला मोठा साप आढळून आला. सर्पमित्राच्या मदतीने त्या सापाला काढण्यात यश आले.







