स्नेहा कोरडेची फॅशन शोमध्ये दमदार कामगिरी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| रसायनी | प्रतिनिधी |

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या अंतर्गत कार्यरत चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज येथील टी.वाय.बी.एस्सी. (फॅशन डिझाइन) शाखेची विद्यार्थिनी स्नेहा सुनिल कोरडे हिने आपल्या उल्लेखनीय कामगिरीने महाविद्यालयासह कोन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या निर्मिती 2025-26 फॅशन शोमध्ये स्नेहा हिने विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट यश संपादन करत एकूण पाच सर्टिफिकेट्स व पाच ट्रॉफीज पटकावल्या. यामध्ये सर्वोत्कृष्ट पृष्ठभाग अलंकरण, सर्वोत्तम आदिवासी प्रेरित संग्रह, वर्षातील विद्यार्थिनी तसेच इतर विशेष कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. तिच्या एकूण उत्कृष्ट सादरीकरणामुळे परीक्षक व उपस्थितांकडून तिचे विशेष कौतुक करण्यात आले.

या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक व रायगड जिल्ह्याचे माजी खासदार रामशेठ ठाकुर यांच्या हस्ते तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) एस.के.पाटील यांच्या हस्ते स्नेहाला ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

स्नेहा ही कोन गावची रहिवासी असून तिच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून आई-वडिलांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version