स्नेहल जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

आ. गोगावले यांच्यावर सडकून टीका

। महाड । वार्ताहर ।

194 महाड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार स्नेहल माणिकराव जगताप यांनी सोमवारी (दि.28) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भव्य रॅलीदेखील काढण्यात आली. या रॅलीने महाडमधील परिवर्तनाची नांदी व्यक्त केली.

महाड विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून आमदार भरत गोगावले यांना चौथ्यांदा निवडणूक लढवत असून महाविकास आघाडीकडून स्नेहल जगताप यांना तिकीट देण्यात आले आहे. सोमवारी सकाळी स्नेहल जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करत महाड शहरांमधून भव्य रॅली काढण्यात आली. संपूर्ण शहरातून काढलेल्या या रॅलीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, महाड विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि तटकरे यांचे निष्ठावंत बाबुशेठ खानविलकर यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला. त्याचप्रमाणे चंद्रकांत बुवा जाधव यांनीदेखील शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी बाबुशेठ खानविलकर यांनी आमदार गोगावले यांची गद्दारी मोडीत काढण्यासाठी आपण या पक्षात प्रवेश केला असल्याचे सांगितले. आमदार गोगावले यांची दादागिरी लोकशाही मार्गाने संपवून टाकू, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे. तर, स्नेहल जगताप यांनीदेखील आमदार गोगावले यांचा कार्यप्रणालीवर टीका केली. पाकिटे घेऊन आणि देऊन विकास होत नसतो, असे सांगून महाड विधानसभा क्षेत्रामध्ये परिवर्तन करण्यासाठी पण उभे असून स्व. माणिकराव जगताप यांची विकासाची स्वप्नपूर्ती करून दाखवू, असे स्पष्ट केले.

Exit mobile version