अजित पवार गटात केला प्रवेश
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवलेल्या स्नेहल जगताप या महायुतीत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरु होती. मात्र, स्नेहल जगताप यांनी महायुतीमधील शिवसेना किंवा भाजपाचा पर्याय न निवडता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पर्याय निश्चित केला. बुधवारी (दि.26) त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी अजित दादांकडून स्नेहल जगताप यांना कोणता शब्द व आश्वासन दिले, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
राज्यात तीन वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय भूकंपानंतर काँग्रेसमध्ये असलेल्या स्नेहल जगताप यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाडचे आमदार मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी स्नेहल जगताप, भाजप आमदार प्रवीण दरेकर व मंत्री भरत गोगावले हे तिन्ही पक्षांचे नेते पोलादपूर येथील कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते. तेव्हापासून स्नेहल जगताप या शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती.
त्यावेळी झालेल्या एका कार्यक्रमात गोगावले म्हणाले होते की, विधानसभा मतमोजणीच्या दिवशी शुभेच्छा देणार्या ताई आज व्यासपिठावर आहेत, याचा आनंद आहे. त्यांना तुम्ही घेतले काय किंवा त्या आमच्याकडे आल्या काय, एकच महायुती आहे. त्यांना कोणाकडे जायचे आहे, त्यांनी ठरवावं, असं मिश्किल विधान करत त्यांनी स्नेहल जगताप यांच्या महायुतीतील प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले होते. आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्नेहल जगताप या राष्ट्रवादीला फायदेशीर ठरू शकतात. तटकरे यांचे आगामी राजकारण आणि पक्षवाढीसाठी स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादी प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.त्यांच्यासह कर्जत तालुक्यातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.
1999 साली पक्षाची स्थापना झाली, तेव्हा तत्कालीन काँग्रेसमधील तीन प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. स्व. माणिकराव जगताप हे यांपैकीच एक नेते होते. राष्ट्रवादीची पूर्णपणाची ताकद स्नेहल जगताप यांच्या पाठीशी आहे. आपल्या सर्वांसोबत राष्ट्रवादीचा खंबीरपणे पाठिंबा असून फक्त महाड किंवा रायगडपुरतेच नव्हे तर संपूर्ण कोकणात स्नेहल जगताप यांच्या कामाची वाह-वाह झाली पाहिजे, अशा शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. याप्रसंगी खासदार सुनिल तटकरे यांच्यासह शिवाजीराव गर्जे, अनिकेत तटकरे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.