। मुंबई । प्रतिनिधी ।
मतदारांवर प्रभाव पाडणारी दारू, पैसे, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तूंचा सुमारे 494 कोटींची संपत्ती आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबईत दहिसर येथे दीड कोटींचे सोने जप्त करण्यात आले.
मतदारांना पैसे, दारू, मौल्यवान वस्तूंचे वाटप करण्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर मतदारांपर्यंत रसद पुरवण्यासाठी पोलिसांच्या गाड्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप महायुतीवर केला होता. पवार यांचा आरोप आणि राज्यात उघडकीस येत असलेल्या घटनांची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने कठोर कारवाईचे आदेश दिले होते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी रुग्णवाहिका, पोलिसांच्या गाड्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर विविध अंमलबजावणी यंत्रणांच्या कारवाया वाढल्या असून थेट प्रचार दौर्यावर असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टरही तपासण्यात आले.