मोदींच्या बैठकीत अधिकार्यांकडून चिंता व्यक्त
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशातील काही राज्य आर्थिकदृष्ट्या अस्थिर आहेत. अशा राज्यांत लोकप्रिय आणि अव्यवहार्य योजना अशाच सुरू राहिल्या तर भारतीय अर्थव्यवस्था श्रीलंकेच्या मार्गावर जाईल, असा इशारा वरिष्ठ अधिकार्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक वरिष्ठ स्तरावरील बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा, कॅबिनेट सचिव राजी गौबा यांच्यासह केंद्र सरकारचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. संसाधनांची टंचाई आहे या मानसिकतेतून बाहेर येऊन अतिरिक्त व्यवस्थापन करण्याच्या नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिकार्यांनी तयार राहावे तसेच विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने गरीबी दाखवणे या अशा गोष्टी सोडून व्यापक दृष्टीकोन बाळगा, अशा सूचना पंतप्रधान मोदींनी अधिकार्यांना दिल्या.
कोरोना काळात सचिवांनी केलेल्या टीमवर्कचा दाखला देत पुढेही अशीच टीम म्हणून करा आणि फक्त आपल्या विभागापुरते मर्यादीत राहू नका, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी सचिवांना अभिप्राय देण्यास आणि त्यांच्या मंत्रालयांशी संबंधित नसलेल्या सरकारच्या धोरणांमधील त्रुटी सुचवण्यास सांगितले. यावेळी दोन डझनहून अधिक सचिवांनी त्यांचे मत व्यक्त केले. यावेळी मोदींनी मोकळ्या मनाने अधिकार्यांचे म्हणणे ऐकून घेतले. दोन सचिवांनी एका राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत घोषित करण्यात आलेल्या योजनांचा उल्लेख केला. तसेच या राज्याची आर्थिक स्थिती खराब आहे. तसेच अशाच योजना इतर राज्यात देखील आहेत आणि ते राज्य देखील आर्थिकदृष्ट्या अस्थिर आहेत. अशा लोकप्रिय योजना लागू करून आपली अर्थव्यवस्था श्रीलंकेच्या मार्गावर जाऊ शकते, असा गंभीर इशारा अधिकार्यांनी दिला.